हिमालयातून परतल्यावर मला उमजले की माझे आयुष्य दुसऱ्यांसाठी आहे- पंतप्रधान

पंतप्रधानांनी प्रसिद्ध फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' सोबत जुन्या आठवणींना शेअर केल्या आहेत.

Updated: Jan 23, 2019, 01:16 PM IST
हिमालयातून परतल्यावर मला उमजले की माझे आयुष्य दुसऱ्यांसाठी आहे- पंतप्रधान  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमातून देशभरातील जनतेशी संवाद साधत असतात. त्यावेळी ते आपल्या बालपण, तरुणपणातील आठवणींना उजाळा देत असतात. शाळकरी मुलांच्या प्रश्नांनाही त्यांच्या वयाप्रमाणे अपेक्षित उत्तर देत असतात. पण यावेळेस पंतप्रधानांनी प्रसिद्ध फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' सोबत जुन्या आठवणींना शेअर केल्या आहेत. हिमालयात व्यतीत केलेल्या दोन वर्षांतल्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कडे त्यांचा कल कसा वाढला याबद्दलही त्यांनी माहिती दिली. त्यांच्या आठवणीतले अनेक किस्से 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'  फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले आहेत. मंगळवारी यासंदर्भातील एक पोस्ट  'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' ने शेअर केली.

संघाशी जवळीक 

हिमालयातून परतल्यावर बदललेल्या आयुष्याबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले आहे. हिमालयातून परत आल्यावर मला उमजले की माझे आयुष्य दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आहे. त्यामुळे हिमालयातून परतल्यानंतर मी अहमदाबादला गेलो. माझे आयुष्य वेगळ्या प्रकारचे होते. मी पहिल्यांदाच कोणत्या तरी मोठ्या शहरात चाललो होतो. तिथे माझ्या काकांना त्यांच्या कॅंटींगमध्ये कधी कधी मदत करत असे. अखेरीस मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ स्वयंसेवक बनलो. तिथे मला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी भेटली. मी तिथे खूप काम केलं. आरएसएस ऑफिस साफ करणे, सहकार्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करणे आणि भांडी घासण्याची वेळ प्रत्येकावर यायची.

एकांत बळ देतो 

हिमालयात मिळालेली शांती मी विसरु शकत नाही. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी प्रत्येक वर्षातील पाच दिवस एकट्यात व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जास्त जणांना माहित नसेल पण मी दिवाळीत अशा जागी जात असतो. ही जागा कुठेही असू शकते. जंगलात असू शकते. जिथे स्वच्छ पाणी असेल पण माणसं राहत नसतील. मी त्या पाच दिवसांचे जेवण पॅक करुन घेतो. त्यावेळी रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्र आणि इंटरनेट यापैकी काहीच सोबत नसतं, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. एकांत मला आयुष्य जगण्याची मजबूती देतो असेही ते म्हणाले.