राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक

राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Updated: Feb 11, 2018, 05:48 PM IST
राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक title=

नवी दिल्ली : राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

गुढा परिसरात बँक लुटण्यासाठी आलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी एक आरोपी हा एकेकाळी देशाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचण्यात आला आणि या टोळीला अटक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा राष्ट्रपती भवनात गार्ड होता.

१० दिवसांच्या सुट्टीवर होता गार्ड 

मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनूंमधील गुढागौडजी परिसरात असलेल्या युको बँकेत चोरी करण्यासाठी आलेल्या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामधील एक तरुण हा राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या युनिटमधील एक गार्ड आहे. हा गार्ड १० दिवसांच्या सुट्टीवर आपल्या घरी आला होता आणि त्याच दरम्यान त्याने मित्रांसोबत बँक लुटण्याचा प्लॅन बनवल्याचं बोललं जात आहे.

अंधाराचा फायदा घेत पसार

शनिवारी युको बँकेतून येत असलेल्या आवाजानंतर एका व्यक्तीने पोलिसांना याची सूचना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जात चार तरुणांना अटक केली. यावेळी बँकेचं शटर तोडून हे चौघेही बँकेत शिरले होते. अंधाराचा फायदा घेत तीन तरुणांनी तेथून पळ काढला.

राष्ट्रपती भवानात अंगरक्षक

पोलिसांनी विकास मीणा याला अटक केली असून त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यामध्ये शक्ति सिंह, संजय आणि संदीप यांचा समावेश आहे. संदीप हा राष्ट्रपती भवानात अंगरक्षक युनिटमध्ये कार्यरत आहे.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत इतरही फरार आरोपींना अटक केली आहे.