सोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना जबरदस्त धक्का बसला आहे. दोन आमदार आणि नेत्यांनी राजीनामा दिला आहे. 

Updated: Apr 10, 2018, 06:18 PM IST
सोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे title=

रायबरेली : उत्तर प्रदेशातलं रायबरेली म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. सोनिया गांधींच्या या मतदारसंघामध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का लागला आहे. रायबरेलीच्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या नेत्यांबरोबरच काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार दिनेश सिंगनी राजीनामा दिला आहे. तसंच रायबरेली जिल्ह्यातल्या हरचंदपूरचे काँग्रेस आमदार राकेश सिंग देखील काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. या दोन नेत्यांबरोबरच रायबरेली जिल्हा पंचायतचे अध्यक्ष अवधेश सिंग यांनीही राजीनामा दिला आहे. अवधेश सिंग हे उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे एकमेव जिल्हा पंचायत अध्यक्ष होते. आमदार दिनेश सिंग यांच्या कुटुंबातील पाच ब्लॉक प्रमुखांनीही राजीनामा दिला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

दिनेश सिंग सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. पण त्यांच्यासोबत राकेश सिंग, अवधेश सिंग अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. विधान परिषद निवडणुकीआधी अमित शहा सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला येणार आहेत.

अमित शहा उत्तर प्रदेशमध्ये

भाजप अध्यक्ष अमित शहा ११ एप्रिलला लखनऊला जाणार आहेत. त्यावेळी हे सगळे नेते भाजपमध्ये जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९च्या निवडणुकांआधी अमित शहांचा उत्तर प्रदेश दौरा महत्त्त्वाचा मानला जात आहे.