अबब! १५०० रूपयांचा आंबा, हळूच तोडा, कापडात ठेवा

चाकूने नव्हे, बांबूच्या चाकूने कापतात आंबा, एकेकाळी  सोन्याच्या दात कोरण्याने कापला जायचा आंबा

Updated: Jun 25, 2018, 09:35 AM IST
अबब! १५०० रूपयांचा आंबा, हळूच तोडा, कापडात ठेवा

नवी दिल्ली: खरं म्हणजे कोणतेही फळ, त्याची खरेदी आणि सेवन ही कोणाचीही मक्तेदारी असत नाही. पण, एक काळ होता फळांचा राजा आंब्याबाबत हे अगदी खरे होते. कोहितूर प्रजातीचा हा आंबा एकेकाळी केवळ राजघराण्यातील व्यक्तिंसाठीच आसायचा. या आंब्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आजही या प्राजातीचे आंबे केवळ श्रीमंत किंवा पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्या मंडळींनाच खरेदी करता येतात. याच आंब्याला भौगोलिक ओळख मिळावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार आता प्रयत्न करत आहे. खास करून नवाब सिराज उदौला याच्या काळात हे आंबे केवळ राजघराण्यातील व्यक्तिंसाठी असायचे.

आजही तितेकच महागडे

आंब्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आजही हा आंबा भलताच महाग असून, एका आंब्याचीच किंमत सुमारे १५०० रूपये इतकी आहे. अत्यांत नाजूक आणि तितकाच मौल्यवान असल्याने या आंब्याची हाताळणीही तशीच करावी लागते. झाडावरून उतरवताना आंब्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हा आंबा झाडवरून काढला की, हळूच कापडात ठेवावा लागतो. अन्यथा, आंबा खराब होण्याची शक्यता वाढते.

साधारण आठराव्या शतकात बंगालच्या नावाबाच्या काळात या आंब्याची प्रजात विकसित करण्यात आली. खास गुणवैशिष्ट्यांमुळे सुरूवातीपासूनच अत्यंत महाग असलेला हा आंबा आजही महागच आहे. या प्रजातिच्या एका आंब्याचा दर (१५००) पाहता तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. मुर्शिदाबादच्या नवाबांचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंब्याला भौगोलिक ओळख मिळवून देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्न करत आहे.

कोहितूर आंब्याबाबत महत्त्वाचे मुद्दे

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात कोहीतूर आंब्याची प्रजात
मूळ कोहितूरचे १४८ प्रकार होते. आज, केवळ ४२ शिल्लख
उरलेल्या आंब्यांचे संवर्धन करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारचे प्रयत्न 

दुर्मिळातील दुर्मिळ कोहितूर

दिसायला काळसर हिरव्या सालीचा असलेला हा अंबा दुर्मिळातील दुर्मिळ आहे. आज रोजी या आंब्याचे केवळ १० ते १५ उत्पादक आहेत. तर, मुर्शिदाबाद जिल्ह्यात कोहितूर आंब्याची केवळ २५ ते ३० झाडे शिल्लख आहेत. खरे तर पश्चिम बंगालमध्ये २०० आमराया असल्याचे सांगितले जाते. पण, तहीरी या प्रजातीच्या आंब्याची झाडे मात्र मोजकीच. या आंब्यांच्या झाडाची खासियत अशी की, कोहितूर आंब्याच्या झाडाला प्रति मोसमात केवळ ४० ते ५० आंबे येतात. त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ तितकाच महाग ठरतो. आतापर्यंत हा आंबा प्रतिनग ५०० रूपयांनी विकला गेला. पण, गेल्या वर्षी याच आंब्याचा दर प्रतिनग १५०० असा निघाला.

सोन्याच्या दात कोरण्याने कापला जायचा आंबा

या आंब्याची खासियत अशी की, हा आंबा अत्यंत नाजूक असल्याने चाकूने कापता येत नाही. त्यासाठी विशिष्ट बनावटीचा बांबूचा चाकू वापरावा लागतो.  नवाबांच्या काळात सोन्याच्या दात कोरण्याने हा आंबा कपला जात असे. याच आंब्याला भौगोलिक ओळख मिळविण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्न करत आहे.

आंब्याची रंजक कहाणी

दुर्मिळ अशा या अंब्याचीही एक खास कहाणी आहे. सांगितले जाते की, तत्कालीन राजा सिराज उद्दौला याने या अंब्याची प्रजात तयार केली. त्याने त्या काळात बगिच्यासाठी उत्कृष्ठ अंब्यांची रोपे मागवली होती. या आंब्यांची लागवड करण्यासाठीही त्याने  अकबराच्या नवरत्नांच्या समकक्ष असलेल्या लोकांचीच निवड केली होती. या लोकांनी आंब्यांच्या रोपांवर विशेष संशोधन करून खास आंब्याची प्रजात तयार केली. ती खास प्रजात म्हणजेच हा दुर्मिळातील अती दुर्मिळ कोहितूर होय.