जनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले

लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Aug 12, 2017, 07:28 PM IST
जनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले

नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणाने टोकदार वळण घेतले आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटविण्याचा निर्णय जनता दलाने (यु) घेतला आहे.

जनता दलाच्या (यु) एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद यादव यांच्या ऐवजी आरसीपी सिंह यांची निवड राज्यसभेतील पक्षनतेने म्हणून करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय पक्षाचा होता. यादव यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध केला होता. जनता दलाच्या नेत्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीवेळी शरद यादव यांना पक्षनेतेपदावरून हटवत त्या जागी आरपी सिंह यांची निवड केल्याचे पत्रही दिली. आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, राज्यसभेत जनता दल (यु) चे १० सदस्य आहेत. पक्षाच्या वतीने शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत राज्यसभेचे सदस्य अली अन्वर अंन्सारी यांना निलंबीत केले. सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या बोलवलेल्या बैठकीत अली सहभागी झाले होते. बैठकीला उपस्थीत राहिल्याबद्धल पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान, लालूप्रसाद यांच्यासोबत असलेल्या आघाडीशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी भाजपप्रणीत एनडीएशी नवा दोस्ताना केला. तेव्हापासूनच शरद यादव आणि नितीश कुमार यांच्यात मतभेद होण्यास सुरूवात झाली होती. नितीश कुमार यांचा निर्णय शरद यादव यांना धोरण आणि पक्षाची चौकट म्हणून पटला नव्हता. त्यामुळे नितीश कुमार यांच्या निर्णयाला शरद यादव यांनी विरोध केला होता.