भाजपला केवळ चिंतनच नव्हे तर आत्मचिंतनाची गरज; शिवसेनेचा टोला

भाजपने नेहमीच मित्रपक्षांनी कमी लेखले

Updated: Dec 11, 2018, 01:01 PM IST
भाजपला केवळ चिंतनच नव्हे तर आत्मचिंतनाची गरज; शिवसेनेचा टोला title=

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपची पिछेहाट झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला डिवचायला सुरुवात केली आहे. आजचे निकाल पाहता भाजपला केवळ चिंतनच नव्हे तर आत्मचिंतनाची गरज आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते मंगळवारी संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आजचे निकाल म्हणजे काँग्रेसचा विजय आहे, असे मी म्हणणार नाही. हा लोकांचा रोष आहे. शिवसेनने गेल्या २५ वर्षांपासून भाजपसोबतचे संबंध जपले आहेत. आतादेखील धर्माच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपसोबत आहे. मात्र, भाजपने नेहमीच मित्रपक्षांनी कमी लेखले, त्यांना वाईट वागणूक दिली, असे राऊत यांनी सांगितले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती तुटली होती. त्यावेळी भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. तेव्हापासून या दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरु आहेत. शिवसेना नेतृत्वाने अनेकदा पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर जाहीर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेला फारशी किंमत न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या काही काळातील बदलती परिस्थिती लक्षात घेता भाजपने शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय. या निकालांनंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. 

तत्पूर्वी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूरही काहीसा मवाळ दिसला. मोदी यांनी निकालांविषयी कोणतेच भाष्य केले नाही. मात्र, त्यांनी विरोधी पक्षांना संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.