बहुमताजवळ असताना मध्य प्रदेशमध्ये सपा, बसपाचा भाजपला दणका

भाजपला मध्यप्रदेशमध्ये झटका लागण्याची शक्यता

Updated: Dec 11, 2018, 03:41 PM IST
बहुमताजवळ असताना मध्य प्रदेशमध्ये सपा, बसपाचा भाजपला दणका title=

भोपाळ : आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये मध्य प्रदेशात सर्वात जास्त अटीतटीची लढाई बघायला मिळतेय. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ११६च्या जादुई आकड्यापर्यंत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना पोहोचता आलेलं नाही. त्यामुळे राज्याची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेनं झाली आहे. ४ आमदार निवडून आलेली बहुजन समाजवादी पार्टी आणि अपक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाने भाजपला दणका दिला आहे. सपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तर बसपाने भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

निकालानंतर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचं वातावरण दिसतं आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं कार्यकर्त्यांनी धूमधडाक्यात स्वागत केलं. काँग्रेसची सत्ता आलीच तर या दोघांमध्येच मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होणार आहे. दुसरीकडे भाजपा कार्यालयात शुकशुकाट असला तरी पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं सुरू असून बहुमताचा आकडा हुकला असतानाही सत्ता स्थापनेसाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत.