राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.

Updated: Jun 22, 2017, 09:03 AM IST
राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर title=

नवी दिल्ली : येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही? यावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधीपक्षांची बैठक होतेय. 

या बैठकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात उमेदवार देण्याबद्दलचा अंतिम निर्णय होईल. कोविंद यांच्या नावाविषयी काँग्रेसचं किंवा इतर विरोधीपक्षांचं मत विचारात घेतलं गेलं नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेससह यूपीएचे १६ घटकपक्ष आज दिल्लीत सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधीगटाचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

मीरा कुमार यांचं नावही चर्चेत

काँग्रेस आणि घटकपक्षांकडून राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. याच अनुषंगानं काल मीरा कुमार यांनी काल सोनिया गांधींची भेटही घेतली. 

विरोधीपक्षांची एकजूट मात्र या बैठकीआधीच फुटलीय. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद सरकारचं नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनं रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आज होणाऱ्या विरोधीपक्षांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. 

याशिवाय उत्तर प्रदेशाचं राजकारण लक्षात घेता कोविंद यांच्या नावाला बहुजन समाज पक्षही विरोध करण्याची शक्यता धुसर आहे. तरीसुद्धा बसपाचे प्रतिनिधी आजच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. 

आम आदमी पक्ष मात्र या बैठकीत नसेल... डाव्या पक्षांनी आधीच कोविंद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातल्या घनिष्ठ पार्श्वभूमीवर त्यांचा विरोध केलाय. बिहारमध्ये सत्ते असणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनीही कोविंद यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलाय.