संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट, राज्यातही हुडहुडी

राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरलीये. राजधानीत तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने १० जानेवारीपर्यंत दिल्ली जवळच्या नोएडामध्ये आठवी पर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात.

Updated: Jan 8, 2018, 08:23 AM IST
संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट, राज्यातही हुडहुडी title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरलीये. राजधानीत तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने १० जानेवारीपर्यंत दिल्ली जवळच्या नोएडामध्ये आठवी पर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात.

थंडीमुळे शाळांना सुट्टी

तर हरियाणातही शाळांना १४ जानेवारी पर्यंत सुटी देण्यात आलीये. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीये. दाट धुक्यामुळे रस्ते विमान आणि रेल्वे वाहतकीला मोठा फटका बसतोय. दिल्लीला जाणाऱ्या १८ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४९ ट्रेन उशीराने धावत आहेत. तसेच १३ एक्स्प्रेस ट्रेनची वेळही बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातही थंडीची लाट

राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असून, राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांत पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. दरम्यान रविवारी राज्यात नाशिकमध्ये ८ अंश, जळगावमध्ये ५ पॉईंट २ अंश, तर गोंदियामध्ये ८ पॉईंट ४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.