ट्रॅफिक पोलिसांना ओरिजिनल कागदपत्रं दाखवायची गरज नाही, सरकारचा निर्णय

कधीकधी ही कागदपत्रे पोलिसांकडून गहाळ होतात.

Updated: Aug 10, 2018, 01:23 PM IST
ट्रॅफिक पोलिसांना ओरिजिनल कागदपत्रं दाखवायची गरज नाही, सरकारचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार यापुढे वाहनधारकांना वाहतूक पोलिसांना त्यांच्या वाहनांची मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक नसेल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला यासंबंधीचे आदेश दिले आहेत. एखादा चालक डिजिलॉकर किंवा एम परिवहन अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, आरसी आणि इन्शुरन्सची कागदपत्रे दाखवत असेल तर ती ग्राह्य धरण्यात यावीत. त्यामुळे वाहनधारकांना गाडीची मूळ कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही. 

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे तसेच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणांमध्ये वाहतूक पोलीस संबंधित व्यक्तीची कागदपत्रे जप्त करतात. मात्र, कधीकधी ही कागदपत्रे पोलिसांकडून गहाळ होतात. त्यासाठी संबंधित वाहनधारकाला पुन्हा खेटे मारण्याची वेळ येते. त्यामुळे ई-डेटाबेसच्या आधारे संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. 

यासाठी वाहनचालकांनी काय करावे?

* मोबाईलवर डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.
* आधार क्रमांकाच्या साहाय्याने हा नंबर ऑथेंटिकेट करावा.
* अॅप्लिकेशनवर वाहन परवाना किंवा नोंदणी क्रमांक अपलोड करावा.
* वाहतूक पोलीस मोबाईलवरुन क्यूआर स्कॅन करुन संबंधित कागदपत्रे तपासू शकतात.
* वाहनधारकाने कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले असल्यास वाहतूक पोलिसांना मुख्य डेटाबेसमध्ये त्याची नोंदणी करता येईल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close