विचारवंतांची हत्या : मारेकऱ्यांना मिळतेय संघटितरित्या मदत - हायकोर्ट

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीनं हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला विचारलाय. 

Updated: Oct 12, 2017, 05:07 PM IST
विचारवंतांची हत्या : मारेकऱ्यांना मिळतेय संघटितरित्या मदत - हायकोर्ट

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीनं हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला विचारलाय. 

अशा वातावरणात आम्ही आमच्या घरात तरी सुरक्षित आहोत का? या शब्दांत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारींनी तपास यंत्रणांना सुनावलं. गौरी लंकेशच्या रूपात आणखी एका विचारवंताची हत्या होणं, हे समाजाचं दुर्भाग्य असल्याचही हायकोर्टाने म्हटलंय.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी दाभोळकर - पानसरे हत्या प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणी झाली. यावेळी सीबीआय आणि एसआयटीनं आपापला तपास अहवाल हायकोर्टात सादर केला. 

मात्र, सध्या तरी यंत्रणेला फारसं मोठं यश न मिळाल्याचं त्यांनी यावेळी कबूल केलं. यावर तपास यंत्रणांनी श्रेयवादाच्या चढाओढीत न अडकता संपूर्ण देश पिंजून काढायला हवा, असा सल्ला हायकोर्टानं दिलाय. 

सध्या तरी मारेकरी हे तपास यंत्रणेपेक्षा हुशार असल्याचं सिद्ध होतंय, याचाच अर्थ मारेकऱ्यांना संघटितरित्या हरप्रकारे मदत पुरवली जातेय, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं हायकोर्ट म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनवणी १४ डिसेंबरला होणार आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close