वर्णिका कुंडू छेडछाड : भाजप नेत्याच्या मुलाला पाच महिन्यानंतर जामीन

आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी विकास बराला याला अखेर जामीन मिळालाय. 

Updated: Jan 11, 2018, 04:47 PM IST
वर्णिका कुंडू छेडछाड : भाजप नेत्याच्या मुलाला पाच महिन्यानंतर जामीन title=

चंदीगड : आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी विकास बराला याला अखेर जामीन मिळालाय. 

तब्बल पाच महिन्यांनंतर बराला याला जामीन मिळाला. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज चार वेळा फेटाळण्यात आला होता. विकास बराला हा हरियाणाचे भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा आहे. या प्रकरणात सुभाषसोबत त्याचा मित्र विकास हादेखील एक आरोपी आहे. 

सुभाष आणि विकासविरुद्ध ४ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री उशीरा वर्णिकाचा पाठलाग करणं, छेडछाड करणं आणि अपहरणाचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.

या प्रकरणात अगोदर पोलिसांनी सुभाष, विकासला ताब्यात घेऊन त्यांच्यावर थातूरमातूर कलमं लावून कारवाई केली होती... परंतु, हे प्रकरण सोशल मीडियाद्वारे बाहेर आल्यानंतर लोकांनी पंचकूला, चंदीगड, हरियाणा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी निदर्शनं केली. दबाव वाढल्यामुळे पोलिसांनी ९ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर अजामीनपात्र कलमं लावली... तेव्हापासून दोघंही आरोपी तुरुंगात होते.