सपा-बसपा युतीचा नेता कोण? मायावती की अखिलेश यादव?

मायावती आणि अखेलश यादव यांना टक्कर देणार तिसरा नेता कोण?

शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2019, 11:32 AM IST
सपा-बसपा युतीचा नेता कोण? मायावती की अखिलेश यादव? title=

नवी दिल्ली : बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव शनिवार एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान सपा आणि बसपा यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे दोन्ही पक्ष लोकसभेच्या 37-37 जागांवर लढणार आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेससाठी त्यांनी जागा सोडली आहे. येथे दोघांचा उमेदवार नसेल. यानंतर 2 जागा या राष्ट्रीय लोकदल आणि इतर छोट्या पक्षासाठी सोडली जाणार आहे. काँग्रेसला सपा-बसपाने युतीपासून लांब ठेवलं आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. सपा-बसपाच्या युतीमुळे येथे भाजपला मोठा फटका बसू शकतो. गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत याचा अंदाज संगळ्यानाच आला आहे.

सपा-बसपा युतीचा नेता कोण?

उत्तर प्रदेशमधील हे 2 मोठे पक्ष युती करत असल्याने या युतीचा नेता कोण असेल याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. अखिलेश यादव आणि मायावती हे दोघेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यात चौधरी अजित सिंह हे तिसरे मोठे नेते आहेत. पण पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जास्त प्रभाव नाही. सपा-बसपाचा राज्यात आपला एक वेगळा मतदार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 39.6% टक्के मतदान झालं होतं. सपा आणि बसपाला 22 टक्के मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये भाजपला 42.6% टक्के मतदान झालं होतं तर सपाला 22 टक्के आणि बसपाला 20 टक्के मतदान झालं होतं. पण बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. 

राजकीय अनुभव

राजकीय अनुभवाबाबत बोलायचं झालं तर बसपाच्या अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेशच्या 3 वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्या लोकसभा आणि राज्यसभेत खासदार देखील होत्या. अखिलेश यादव हे देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. लोकसभेत खासदार म्हणून देखील ते राहिले आहेत. बसपामध्ये काशीराम यांच्यानंतर मायावती अध्यक्षा झाल्य़ा. त्यांना आव्हान देणारं पक्षात कोणीच नाही. दुसरीकडे अखिलेश यादव यांनी वडील मुलायम सिंह यादव यांना हटवत पक्षाच्या अध्यक्षाची जागा घेतली.

आमदार, खासदारांची संख्या

लोकसभेत समाजवादी पक्षाचे 7 खासदार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत समाजवादी पक्षाचे 48 आमदार आहेत तर बसपाचे 19 आमदार आहेत. बसपाचे राज्यसभेत 4 खासदार आहेत तर समाजवादी पक्षाचे 11 खासदार आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशात मजबूत आहेत. पण मायावती या अखिलेश यादव यांना युतीचा नेता मानतील का यावर प्रश्नचिन्ह आहे. तर अखिलेश यांच्याबाबतीत ही असाच प्रश्न उपस्थित होतो.