माझ्या भूमिकेविषयी नागपुरातच बोलेन: प्रणव मुखर्जी

नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.

Updated: Jun 3, 2018, 08:25 AM IST
माझ्या भूमिकेविषयी नागपुरातच बोलेन: प्रणव मुखर्जी title=

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून देशात गेले काही दिवस सुरू झालेल्या चर्चेवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अखेर भाष्य केले आहे. ही चर्चा सुरू झाल्यापासून त्यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे या विषयावर मुखर्जी मौन का बाळगत आहेत, असा सवाल विचारला जात होता. दरम्यान, मला जी काही भूमिका मांडायची आहे ती, भूमिका मी थेट नागपुरातच मांडेन, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

मी सर्वांची मते ऐकली

प्रणव मुखर्जी यांनी आनंद बजार पत्रिका या बंगाली वृत्तपत्रास एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मुखर्जी यांनी हे भाष्य केले. मुखर्जी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले निमंत्रण मी स्विकारले. हे निमंत्रण स्विकारल्याचे समजताच मला अनेकांची पत्रे आली तसेच अनेकांनी फोनही केले. मी सर्वांची मते ऐकली पण, पण कोणालाही उत्तरे दिली नाहीत. पण, माझी भूमिका मी नागपूरमध्येच मांडेन असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी भूमिका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक पत्र लिहून व्यक्त केली होती. तर, काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते जयराम रमेश, सी. के. जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला आहे.

काय बोलणार मुखर्जी?

दरम्यान, या चर्चेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती हा मोठा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.  नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ७ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाची सुरूवात १४ मे पासून झाली होती. या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.