बॅंक दरोडाप्रकरणी ११ जण ताब्यात, ५० टक्के मुद्देमाल हस्तगत

आयुष्यात अनेक गुन्हे केले. पण आता शेवटचा गुन्हा करायचा आणि सेटल व्हायचं असं ठरवूनच नवी मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये आरोपींना दरोडा टाकला.

Updated: Dec 6, 2017, 08:52 PM IST
बॅंक दरोडाप्रकरणी ११ जण ताब्यात, ५० टक्के मुद्देमाल हस्तगत  title=

नवी मुंबई : आयुष्यात अनेक गुन्हे केले. पण आता शेवटचा गुन्हा करायचा आणि सेटल व्हायचं असं ठरवूनच नवी मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये आरोपींना दरोडा टाकला. पोलिसांनी याप्रकरणी ११ आरोपींना अटक केलीय. तर चार जण अजूनही फरार आहेत. चोरीला गेलेला ५० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. 

५ महिने हे भुयाराचं खोदकाम

बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर ब्रँचमध्ये भुयार खोदून दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. 30 लॉकर फोडून त्यातील तब्बल ३ कोटी ४३ लाख ४२ हजार रूपये चोरट्यांनी लांबवले. दरोड्यापूर्वी ५ महिने हे भुयाराचं खोदकाम सुरू होतं. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. अखेर पोलिसांना या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय.

हरयाणारतीही असाच दरोडा

२०१४ मध्ये हरयाणात अशाच प्रकारे भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला होता. तेव्हाही लॉकर तोडून लूट झाली होती. युट्यूबवर याची लिंकही आहे. याचा आधार घेऊन दरोडा टाकण्याचं आरोपींनी ठरवलं. मुख्य आरोपी आणि इतर चौघांची विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना जेलमध्ये मैत्री झाली. त्यातून त्यांनी मोठा दरोडा टाकण्याचं ठरवलं. त्यासाठी बँक ऑफ बडोदाची जुईनगर ब्रँच हेरली. तिथे शेजारीच दुकान भाड्याने घेऊन आठ लाख रूपये खर्च करून दरोडा मार्गी लावला. 

यूपीतून कामगार मागवले

त्यातल्या प्रत्येकाने कामं वाटून घेतली होती. त्यासाठी युपीतून कामगारही मागवले होते. ११ नोव्हेंबरला भुयारातून लादी फोडून त्यांनी बँकेत प्रवेश केला. साध्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून ३० लॉकर फोडले. भुयाराचं खोदकाम सुरू असताना वॉकी टॉकीचा वापरही केला. गॅस कटर, ड्रील मशीन, बॅटरीवरील दिवे वापरले. आत खोदकाम सुरू असताना बाहेर गाडीत बसून दोघं जण पहारा देत असत.

१० मिनिटात तोडलं लॉकर

धक्कादायक म्हणजे एक लॉकर फोडण्यासाठी अवघ्या १० मिनिटांचा वेळ लागला. तीन मोठे स्क्रू ड्रायव्हर, एक छोटा स्क्रू ड्रायव्हर आणि तीन माणसं यांच्या मदतीने लॉकर दहा मिनिटात फोडता येतो हे आणखी धक्कादायक आहे. 

दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली

दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिलीय. यातले काही दागिने मालेगाव इथे सोनार राजेंद्र वाघ याला विकल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी वाघला अटक करून त्याच्याकडून १७ लाख २५ हजारांचे दागिने जप्त केले. ११ जण आत्तापर्यंत अटक झालेत. मुख्य चारही आरोपी पकडले गेलेत. तर आणखी चार आरोपी फरार आहेत.