देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म 

देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी  title=

मुंबई : पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. भारतीय डॉक्टरांनी आशिया खंडातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आई होण्याचं सुख अनुभवलं आहे. ही यशस्वी प्रत्यारोपण पुण्यातील डॉ शैलेश पुणतांबेकर यांच्या टीमने केलं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर या महिलेने गोंडस मुलीला गॅलेक्सी केअर रूग्णालयात जन्म दिला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. 32 व्या आठवड्यात या महिलेची प्रसूती करण्यात आली. या मुलीचं वजन 1.450 किलो ग्रॅम असून महिलेची प्रसूती ही लॅप्रोस्कोपी पद्धतीने झाली आहे. महत्वाचं म्हणजे गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच प्रसूतीसाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे. 

गुजरातच्या या महिलेचं गर्भाशय निकामी झाल्याने, तिला तिच्या आईने गर्भाशय दान केलं होतं. गेले सात महिन्यांपासून या महिलेवर पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.