राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट, मराठवाडा ९ तास अंधारात

राज्यात आपत्कालीन परिस्थिती म्हणून सगळीकडेच लोडशेडिंग सुरु करण्यात आले आहे. 

Updated: Sep 13, 2017, 10:07 PM IST
राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट, मराठवाडा ९ तास अंधारात

औरंगाबाद : राज्यात आपत्कालीन परिस्थिती म्हणून सगळीकडेच लोडशेडिंग सुरु करण्यात आले आहे. औरंगाबाद सह संपूर्ण मराठवाड्यात हे लोडशेडिंग ९ तास असणार आहे, यामुळे सर्वसामान्य तर वैतागणार आहे, मात्र औद्योगिक वसाहतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. आता ही लोडशेडिंग नक्की किती दिवस चालणार आणि किती दिवस हा त्रास असणार हे मात्र स्पष्ट नाही.

राज्यात सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे मराठवाडाही चांगलाच होरपळून निघतोय. मराठवाड्यात आता तब्बल ९ तास वीज बंद राहणारेय. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ही लोडशेडिंग होणारेय. १२ सप्टेंबरला लोडशेडिंग सुरू झाली आणि औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीला पहिल्याच दिवशी मोठा फटका सहन करावा लागला.

औरंगाबादच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ४५० लहान-मोठे उद्योग आहेत. या सर्व उद्योगांना १२ सप्टेंबरला मोठा फटका बसला. ९ तास वीज गायब राहिल्यामुळे उद्योजक चांगलेच वैतागलेत. त्यांनी थेट महावितरणलाच जाब विचारला.

फक्त एकाच दिवसांत कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा दावा उद्योजक करतायत. हे नुकसान कसं भरून निघणार याचं उत्तर ना महावितरणकडे आहे ना उद्योजकांकडे. उद्योगात वीज चोरी नगण्य असूनही फटका का? असा सवाल उद्योजक विचारतायत.

उद्योगांच्या बाबतीत चूक झाल्याचं महावितरण मान्य करतेय. आता उद्योगांची लोडशेडिंग किमान औरंगाबादपुरती तातडीनं बंद करण्याचं आश्वासन महावितरण मराठवाडा झोनच्या महाव्यवस्थापकांनी दिलंय.

मात्र गेल्या सहा महिन्यात म्हणजे डिसेंबर २०१६ ते जून २०१७ पर्यंतचा महावितरणचं मराठवाड्यातलं नुकसान १८१६ कोटी असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्याचं लोडशेडिंग तात्पुरतं असलं तरी ज्या भागात वीज चोरी मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक वीज बिल भरणा करत नाही त्याठिकाणी लोडशेडिंग कायम राहणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय.

राज्याला सध्या १५ हजार ३२८ मेगावॅटची गरज आहे मात्र उपलब्ध वीज १४ हजार ८१२ एवढी आहे. म्हणजे ५१६ मेगावॅटची सध्या तूट आहे. त्यामुळं सध्या तरी सगळीकडेच लोडशेडिंग अटळ आहे. मात्र आता वीजचोरांना दणका देण्यासाठीही महावितरण लोडशेडिंगचंच हत्यार उपसणारेय. मात्र यामुळं जी लोक वीज बिल नियमित भरतात त्यांनाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागणारेय. त्यामुळं चोरांच्या कर्माची फळं सन्याशालाही भोगावी लागणार यात वाद नाही.