दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

Updated: Oct 25, 2017, 04:40 PM IST
दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती  title=

पुणे : दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे. यावर्षी होणार असलेल्या दोन्ही बोर्डाच्या म्हणजेच माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलीय.

परीक्षेचा अर्ज भरण्यासाठीच आधार नंबरची यंदा सक्ती करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी आधार नंबरसाठी परीक्षेचा अर्ज भरण्यापासून विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नसल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं. पण जे विद्यार्थी अर्ज भरताना आधार कार्ड नंबर देणार नाहीत त्यांना निकाल येईपर्यंत आधार कार्ड देण्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळं आधार कार्डशिवाय निकाल मिळणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

गेल्या वर्षीही अशाच प्रकारचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र  विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आधार कार्डची सूट देण्यात आली होती. यंदापासून मात्र सक्ती करण्यात आली आहे.