'अॅन्टी हेल गन'... शेतकऱ्यांची मदत करणार?

गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. या पार्श्वभूमीवर होणारं हे असं नुकसान टाळण्याची गरज आहे. 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्याने गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

Updated: Feb 13, 2018, 07:25 PM IST
'अॅन्टी हेल गन'... शेतकऱ्यांची मदत करणार?

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. या पार्श्वभूमीवर होणारं हे असं नुकसान टाळण्याची गरज आहे. 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्याने गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

'अॅन्टी हेल गन'

गारपिटीची तीव्रता कमी करणाऱ्या तोफा... गेल्या दोन दिवसात विदर्भ तसेच मराठवाड्याला गारपिटीनं झोडपून काढलंय. या अस्मानी संकटावर 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गारा विरोधी तोफेच्या सहाय्याने मात करणं शक्य आहे. महाराष्ट्रात ११ जिल्ह्यांतील ५० तालुक्यांना गारपिटीचा फटका बसलाय. १०८६ गावांतील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिक या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालंय. शेतावर काम करणाऱ्या तिघांचा या गारपिटीत मृत्यूही झालाय. अस्मानी संकट म्हणतात ते हेच...

विशेष म्हणजे गारपीट होण्याची शक्यता आहे हे माहित असूनही हे सगळं घडलं. मग प्रश्न येतो हे टाळणं शक्य होत का? तर त्याचं उत्तर काही प्रमाणात होकारार्थी आहे. जगातील अनेक देशांत, इतकंच काय तर आपल्याकडे हिमाचल प्रदेश, आसाम सारख्या राज्यांत या समस्येवर समाधान शोधण्यात आलय. ते म्हणजे 'अॅन्टी हेल गन'... म्हणजेच गाराविरोधी तोफ... ही एक विशिष्ट प्रकारची तोफ आहे जी ढगांतील गारांवर तीव्र हवेचा मारा करते. 

त्याचा परिणाम म्हणून दोन किलोमीटर उंचीवरील ढगांतील गारांचा चुरा होतो. वादळी पावसासोबत हा चुरा जमीनीवर कोसळला तरी पींकांचं फारसं नुकसान होत नाही. हिमाचल प्रदेशात सफरचंदांचं संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाल्याचं भूगर्भशास्त्रज्ञ अरुण बापट यांचं म्हणणं आहे.

'मेड इन इंडिया'

सुरुवातीला ही तोफ बाहेरून आयात करावी लागायची... आता ती आपल्या देशात बनवणं शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. शिवाय या तंत्रज्ञानाचा खर्चही कमी आहे. ही तोफ गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणंही शक्य आहे. शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून गारा विरोधी तोफ उपलब्ध करून देण्यात गरज व्यक्त होत आहे.

गारपीट ही आपल्याकडील अपवादात्मक समस्या नाही. तर दरवर्षी कुठे ना कुठे गारपीटीचा फटका बसतो. आधीच दुष्काळ आणि नापिकीमुळे ग्रस्त असलेला शेतकरी अशा संकटांमुळे पार उध्वस्त होतो. अशा परिस्थितीत गारपीट रोखणं शक्य नसली तरी त्यामुळे होणारं संभाव्य नुकसान निश्चितपणे टाळलं जाऊ शकतं. त्या दृष्टीकोनतून नवनविन प्रयोग राबवले जाणं नितांत आवश्यक आहे.