मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील कोर्टाचं अटक वॉरंट

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का

Updated: Sep 14, 2018, 11:27 AM IST
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील कोर्टाचं अटक वॉरंट

नांदेड : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. नायडूं यांच्यासह १५ जणांविरुद्ध हे अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. 2010 मध्ये गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट बजावले आहे. धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशमध्ये विरोधात असतांना 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. नायडू यांच्यावर या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणात न्यायालयाने 5 जुलै रोजी आदेश दिला होता की, 16 ऑगस्टपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्यानंतर मात्र त्यात दुरुस्ती करून ही तारीख २१ सप्टेंबर करण्यात आली. नायडू यांच्याबरोबरच तेथील जलसंपदा मंत्री देवीनेनी उम्मामेश्वरा राव आणि समाजकल्याण मंत्री एन. आनंद बाबू, माजी आमदार जी. कमलाकर यांचाही समावेश आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close