चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा

मित्रांसोबत मजा मस्ती करायला हॉटेलमध्ये गेला असतांना सहज गम्मत म्हणून त्यानं चोरी केली.

Updated: Jul 10, 2018, 09:35 PM IST
चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मित्रांसोबत मजा मस्ती करायला हॉटेलमध्ये गेला असतांना सहज गम्मत म्हणून त्यानं चोरी केली. मात्र तिथल्या सीसीटीव्ही कँमेरात ही चोरी कैद झाली. आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून चोरीची घटना व्हायरल झाली.  औरंगाबादच्या एका कॉफीशॉपमधील हा चोरीचा प्रकार आहे, चोरी करणारा हा युवक कुठला सराईत चोर नाही तर फक्त मजेसाठी, काहीतरी धमाल म्हणून त्यानं हा प्रकार केला.

हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेलं काही सामान त्यानं सहज उचलले आणि टी शर्टमध्ये लपवून निघूनही गेला. अगदी सराईत चोरासारखं त्यानं हे सामान चोरलं. मात्र हा सगळा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद होत असल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही. हा सगळा प्रकार हॉटेलचालकाच्या लक्षात आला. सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर हा मुलगा चांगल्या घरचा असल्याचं लक्षात आलं. या विद्यार्थ्याचे नुकासन होवू नये म्हणून या हॉटेल मालकानं पोलिसांत तक्रार करण्याऐवजी त्याला धडा शिकवावा म्हणून हॉटेलच्या फेसबुक पेजवर हा प्रकार शेअर केला..

सोशल मिडियावर शेअर झाल्यानंतर काहीच तासात ज्या मुलानं ही चोरी केली होती त्यानं हॉटेल गाठलं आणि फक्त मौजमजेसाठी हा प्रकार केल्याचं कबूल केलं, आणि माफीही मागितली.  परदेशात शिक्षण घेणा-या या मुलाचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून हॉटेल मालकानंही समजून घेतलं. मात्र या मुलाला अनाथ आश्रमात जावून १५ हजारांचे दान करण्याची शिक्षा सुनावली.

मजेसाठी केलेली ही चोरी अंगलटही येवू शकली असती, पोलिसांत तक्रार गेल्यावर शैक्षणिक आयुष्यही धोक्यात येवू शकत होतं, तेव्हा तरूणांनो काहीतरी थ्रील करण्याच्या नादात किंवा कोणाला दाखवण्यासाठी असलं कृत्य करु नका.