बीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

आज वेध मतदारसंघाचामध्ये आढावा घेणार आहोत, बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड जिल्ह्याचा.

Updated: Jun 24, 2018, 09:49 PM IST
बीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : आज वेध मतदारसंघाचामध्ये आढावा घेणार आहोत, बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड जिल्ह्याचा. एकेकाळी काँग्रेसचा दबदबा असणारा हा मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंचा झाला. पाहुया सध्या या मतदारसंघात काय घडतंय.अतिमागास आणि ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यावर आधी काँग्रेसचं वर्चस्व होतं. पण  गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपनं बीड काबीज केलं. आज गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरही बीडमध्ये भाजपचा दबदबा कायम आहे.

बीड जिल्हा हा आर्थिक,सामाजिक दृष्ट्या मागास असला तरी राजकारणाच्या बाबतीत मात्र कायम आपला वेगळा ठसा निर्माण करणारा राहिलाय. 80 च्या दशकानंतर बीड जिल्ह्यावर काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर यांनी कब्जा केला,सलग तीन वेळा त्या खासदार झाल्या,त्यानंतर मात्र गोपीनाथ मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली आणि रजनी पाटील,जयसिंग गायकवाड यांच्यासारख्या लोकांना संधी मिळाली .

मुंडे यांनी 2009 मध्ये राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले,त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत देखील मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा पराभव केला आणि केंद्रात मंत्रिपद मिळवलं. मुंडे यांचं निधन झाल्यानंतर  झालेल्या पोटनिवडणुकीत मुंडे यांची कन्या प्रीतम या देशात सर्वाधिक मतदान घेऊन विजयी झाल्या .

गेल्या चार वर्षाच्या काळात प्रीतम मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला,राष्ट्रीय मागमार्ग असोत की नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न असो त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला .रस्ते ,वीज,पाणी या सारखे प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आले असले तरी अल्प जनसंपर्क हा त्यांच्याबद्दलची नाराजी  ओढवणारा मुद्दा ठरू शकतो .

बीड जिल्ह्यात आजमितीस पंकजा मुंडे यांच्यासह पाच आमदार भाजपचे आहेत तर एकमेव जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत,धनंजय मुंडे यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला विरोधी पक्ष नेतेपद मिळालंय. आज बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल असे चित्र आहे .

नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न असो की सिंचन प्रत्येक पातळीवर खासदार अपयशी ठरल्याची टीका विरोधक करतात. विरोधक काहीही म्हणत असले तरी आपले कामच आपल्याला पुन्हा विजय मिळवून देईल असा विश्वास प्रीतम मुंडे यांना आहे. 

बीडच्या खासदार यांचं काम पाहता त्यांनी विकास कामासाठी मोठा निधी आणलाय, ही वस्तूस्थिती आहे. राजकीय दृष्ट्या विचार केल्यास प्रीतम यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करणारा उमेदवार शोधण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर येईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात .

जिल्हा परिषदे सह जवळपास पाच पंचायत समित्या भाजप च्या ताब्यात आहेत तर चार नगर पालिका आणि चार नगर पंचायत मध्ये देखील भाजप ची सत्ता आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत तरी भाजपचं पारडं या मतदारसंघात जड दिसतंय.