तिरुपतीला केसदान तर शिर्डीला रक्तदान

शिर्डीसह संपूर्ण देशभरातील रुग्णांच्या मदीसाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ रक्त संकलन केंद्राची सुरवात करण्यात आलीय. 

Updated: Aug 22, 2017, 03:33 PM IST
तिरुपतीला केसदान तर शिर्डीला रक्तदान  title=

शिर्डी : शिर्डीसह संपूर्ण देशभरातील रुग्णांच्या मदीसाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ रक्त संकलन केंद्राची सुरवात करण्यात आलीय. 

साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. देशभरात विविध रुग्णांकरता रक्ताची अत्यंत गरज आहे. रक्ताला इतर कोणताही पर्याय नाही. याकरता 'तिरुपतीला जसे केसदान तसे शिर्डीला रक्तदान' ही संकल्पना राबवण्यात आलीय.

त्याचाच एक भाग म्हणून मंदिर परिसरात हे रक्तदान केंद्र सुरु करण्यात आलंय. या ठिकाणी साईभक्तांना रक्तदान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. त्याचप्रमाणे रक्त संकलनासाठी अद्यावत स्वरुपाचे दालन असावे, म्हणून मंदिर परिसरात लेंडीबागेजवळ रक्त संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.

शिर्डीत दररोज ५० हजार भाविक दर्शनासाठी येतात, यातील एक टक्का साईभक्तांनी रक्तदान केले तर रोज ५०० दात्यांकडून रक्तदान होईल. संस्थान राज्यातील २५ रक्तपेढ्यांशी संपर्क करुन येथून संकलीत झालेले रक्त त्या रक्तपेढ्यां घेवून जातील. राज्यामध्ये सुमारे ६ हजार थॅलेसेमीया आजाराचे रुग्ण असून त्यांना याचा लाभ होईल.