चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम समोर आलं आहे.

Updated: Jan 21, 2018, 05:32 PM IST
चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप  title=

गोकाक : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम समोर आलं आहे. कर्नाटक जिल्ह्यातल्या गोकाक या गावी जाऊन त्यांनी एका कार्यक्रमात कन्नड गाणं गायलंय. कर्नाटकवर प्रेम व्यक्त करणार हे गीत आहे. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीमावासीय मराठी भाषिकांत तीव्र संतापाचं वातावरण आहे.

विशेष म्हणजे सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री असूनही चंद्रकांत पाटील यांचं बेळगावकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल, या निमित्तानं उपस्थित होतोय. जन्माला आलो तर कर्नाटकमध्ये जन्मायला यायला हवं, असा या गीताचा अर्थ आहे.

हे गाणं आकस्मीका या कन्नड चित्रपटातलं असून, कर्नाटकचे सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर राजकुमार यांनी हे गाण गायलेलं आहे. या चित्रपटात वापरलेला ध्वजच कन्नड रक्षण वेदिका आपला ध्वज म्हणून वापरते.

इतकंच नव्हे तर १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागातला मराठी बांधव काळा दिवस रुपात पाळत असताना, त्याच दिवशी हे गाण कर्नाटक राज्य उस्तवात प्रमुख गीत म्हणून सर्वत्र वाजवलं जातं. म्हणूनच बेळगावमधल्या मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणा-या चंद्रकांत पाटील यांच्या या कृतीमुळे, सीमा भागातल्या मराठी भाषिकांत संतापाची लाट उसळली आहे.