चंद्रपूर-पुणे रेल्वेसेवा सुरू

चंद्रपूर हा राज्याच्या टोकाकडचा जिल्हा आता पुण्याशी थेट रेल्वेनं जोडला गेला आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही रेल्वेसेवा सुरु झाली. दिवाळी पाडव्याला म्हणजे २० ऑक्टोबरला पुण्याहून सुटलेली पुणे-काझीपेठ ही थेट रेल्वेगाडी, भाऊबिजेच्या दिवशी चंद्रपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली आणि इतिहास रचला गेला.

Updated: Oct 22, 2017, 11:27 AM IST
चंद्रपूर-पुणे रेल्वेसेवा सुरू title=

पुणे :चंद्रपूर हा राज्याच्या टोकाकडचा जिल्हा आता पुण्याशी थेट रेल्वेनं जोडला गेला आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही रेल्वेसेवा सुरु झाली. दिवाळी पाडव्याला म्हणजे २० ऑक्टोबरला पुण्याहून सुटलेली पुणे-काझीपेठ ही थेट रेल्वेगाडी, भाऊबिजेच्या दिवशी चंद्रपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली आणि इतिहास रचला गेला.

चार टर्म खासदारकी मिळालेले स्थानिक खासदार आणि विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांतले सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्याला आहेत. तर नोकरी निमित्तानं पुण्यात स्थायिक असलेल्या चंद्रपूर-गडकचिरोलीकरांची संख्याही मोठी आहे. या सर्वांना ये-जा करण्यासाठी एसटी किंवा खासगी बसेस हाच पर्याय आहे जो अत्यंत खर्चिक आहे. शिवाय ऐन सणासुदीच्या काळात तिकीटाची रक्कम दुप्पट-तिप्पट आकारली जात असल्यानं, हा भुर्दंड आवाक्याबाहेर जातो.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयानं तेलंगणातल्या काझीपेठ ते चंद्रपूरमार्गे पुणे अशी गाडी सुरु केली. त्यामुळे चंद्रपूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. चंद्रपुरात पोहोचलेल्या या पहिल्या रेल्वेगाडीचं प्रवासी संघटना, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं.

सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी प्रतिसाद बघता आठवड्यातून ३ वेळा करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनापुढे आहे. चंद्रपूरकर जनतेच्या रेट्यानं पुणे सर झालं असलं तरी, थेट मुंबईपर्यंत रेल्वे हे स्वप्न अजून साकार व्हायचं आहे. ते साकार झाल्यास ख-या अर्थानं चांदा ते बांदा संपर्काचं जाळं विकसित होणार आहे.

राज्यातील नागरिकर वाढविण्यासाठी तसेच, ग्रामिण भाग आणि शहरी भाग यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील सेवा ग्रामिण भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक ठरते. हे होण्यासाठी ग्रामिण भाग आणि शहर यांच्यातील अंतर कमी कालावधीत पार होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चंद्रपूर पुणे ही रेल्वे राज्याच्या विकासात महत्त्वाची भर टाकेन असा विश्वास चंद्रपुरातील अभ्यासकांना वाटतो.