लहरी हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

राज्याच्या काही भागात सोमवारी पावसाच्या सरी आल्याने शेतक-यांचं मोठं नुकसान झालं.

Updated: Nov 21, 2017, 10:32 AM IST
लहरी हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता title=

मुंबई : राज्याच्या काही भागात सोमवारी पावसाच्या सरी आल्याने शेतक-यांचं मोठं नुकसान झालं. अनेक भागात सकाळपासून ढगाळ हवामानामुळे सूर्याचं दर्शनच झालं नाही. तापमानातही वाढ झाली. त्यामुळे थंडीही पळाली...त्यामुळे अशा या लहरी हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

राज्यात सर्वत्र थंडी पडायला सुरूवात झाली असतानाचा आठवड्याचा पहिला दिवस मात्र निसर्गाच्या लहरीपणाची साक्ष देऊन गेला. सकाळपासूनच राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होतं. अनेक ठिकाणी ऐन थंडीत अवकाळी पाऊस झाला. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यासोबत रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यातही पाऊस झाला.

रायगड जिल्ह्यात पनवेल, रोहा भागात रिमझीम पाऊस झाला. ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर, अंबरनाथमध्येही पाऊस झाला. तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरही काही भागात हलका पाऊस झाला. अरबी समुद्रात मालदीव ते दक्षिण कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे राज्यातल्या तापमानात वाढ झाली. पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तापमानात वाढ होणार आहे. त्यातच पाऊस आल्यामुळे या लहरी हवामानाचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता वाढते. व्हायरल इनफेक्शनचा धोका वाढतो. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी हे विकार वाढण्याची शक्यता आहे. तसंच अस्थम्याचा त्रास असलेल्यांनाही या वातावरणाचा त्रास होऊ शकतो. श्वसनाचा त्रास असलेल्यांनी जास्त धुक्यात न जाता घरातच थांबावं असा सल्ला डॉ कृष्णकांत ढेबरी यांनी दिलाय. 

ऐन थंडीत पावसाच्या सरी कोसळल्यामुळे स्वेटर घालावा की माळ्यावर टाकलेली छत्री बाहेर काढावा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. विनोदाचा भाग सोडला तरी सध्याच्या या लहरी हवामानात तुमची तब्येत सांभाळा हे महत्त्वाचं...