मुख्यमंत्र्यांचे नाशिककरांना गाजर?

नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केवळ आश्वासनं दिली अशी तक्रार केली जातेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

Updated: May 29, 2017, 10:58 PM IST
मुख्यमंत्र्यांचे नाशिककरांना गाजर? title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केवळ आश्वासनं दिली अशी तक्रार केली जातेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

मुख्यमंत्र्यांचा ताफा, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहून नाशिककरांना राज ठाकरे यांचे दौरे आठवले. नाशिकमध्ये प्रथमच महापालिकेत भाजप सत्तेवर आलीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा गाजावाजा होणारच होता.

महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे विकास कामांसाठी २१०० कोटींची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हात आखडता घेत कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही. नोकर भरतीत केवळ यांत्रिक पदे भरण्याच्या सूचना दिल्या. 

याशिवाय महापालिका राज्यसरकारच्या माध्यमातून कोणत्या योजना साकारू शकते आणि त्यामाध्यमातून महापालिका किती पैसा उभारू शकते त्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना अधिकारी आणि पदाधिका-यांना केल्या. 

या दौऱ्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली होती. महापालिकेला रंगरंगोटी करून भाजपच्या झेंड्याच्या रंगात सजवण्यात आलं होतं. दौऱ्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाशिकला ठोस काहीच मिळालं नाही त्यामुळे विरोधकांना टीकेची संधी मिळाली. 

निवडणुकीच्या काळात नाशिक दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यापुढे ठरविक अंतराने महापलिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याच आशावासन मुख्यमंत्र्यांनी दिलाय. अशाच स्वरूपाचं आश्वासन मनसे अध्यक्षांनी दाखवून सत्ता मिळवली होती. पण ते पूर्ण होत नसल्याचं पाहिल्यावर नाशिककरांनी इंजिन यार्डात पाठवलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी यातून काय तो बोध घ्यावा ही नाशिककरांची भावना आहे.