शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

आठ महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात

Updated: Oct 23, 2018, 02:19 PM IST
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा title=

मुंबई: फडणवीस सरकारकडून मंगळवारी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
 राज्य सरकारच्या या घोषणेनंतर लवकरच केंद्र सरकारचे पथक दुष्काळसदृश भागांची पाहणी करणार आहे. यानंतर दुष्काळाची घोषणा करण्यात येईल.  तोपर्यंत राज्यातील १८० जिल्ह्यांमध्ये आतापासूनच दुष्काळ नियंत्रणात आणण्यासाठी शिक्षण, चारा, वीज यासह आठ महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
 

 
प्राथमिक माहितीनुसार, सध्याच्या घडीला अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि वाढता उन्हाळा यामुळे राज्यातील १७२ तालुक्यांतील परिस्थिती गंभीर आहे. तर २०१ तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत अपुऱ्या पावसामुळे भीषण टंचाई आहे. या सर्व तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी, त्यातही काही तालुक्यांमध्ये जेमतेम २५ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. 

 

या भागातील पिके तसेच पिण्याचे पाणीसाठे धोक्यात आले आहेत. मराठवाडय़ातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ांतील परिस्थिती अधिक गंभीर आहे. राज्याच्या अन्य भागांतही काही तालुक्यांमध्ये अशीच स्थिती आहे.

'या' आहेत उपाययोजना 

* पिण्याच्या पाण्यासाठी टँकर योजना 

* रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट 

* टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे 

* शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट 

* जमीन महसुलातून सूट 

* शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थिगिती