शेतकऱ्यांच्या संपाबाबत गोंधळ, कुठे आनंदोत्सव तर कुठे रास्ता रोको सुरूच

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु, मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या या शेतकऱ्यांचा निर्णय राज्यातील इतर शेतकरी संघटनांना मात्र मान्य नसल्याचं दिसतंय.

Updated: Jun 3, 2017, 12:05 PM IST
शेतकऱ्यांच्या संपाबाबत गोंधळ, कुठे आनंदोत्सव तर कुठे रास्ता रोको सुरूच    title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु, मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या या शेतकऱ्यांचा निर्णय राज्यातील इतर शेतकरी संघटनांना मात्र मान्य नसल्याचं दिसतंय.

किसान क्रांती सेनेचा आनंदोत्सव

राज्य सरकारने ८० टक्के मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांचा संप मिटल्यानं काहींनी आनंदोत्सव व्यक्त केला. लासलगाव जवळील ब्राम्हणगाव विंचूर येथे किसान क्रांती सेनेचे शेतकरी फटाके फोडून आनंद साजरा केला.

इंदापूरमध्ये भरला आठवडा बाजार

इंदापूरमधल्या निमगाव केतकीतील आठवडेबाजार आज भरलाय. संपामुळे आठवडे बाजार न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तशी हाकही शेतक-यांनी दिली होती.  आता बाजार भरायला सुरूवात झालीय. पण काही काळ बाजारात तणाव निर्माण झाला होता.

संप सुरूच राहणार - शेतकरी महासंघ

परंतु, अनेक ठिकाणी संप माघारीवरुन शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. संपूर्ण कर्ज माफी यासाठी शेतकरी महासंघाच्यावतीनं आज मुख्य मंत्र्याच्या वर्षा बंगल्याबाहेर दूध ओतून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र मराठा शेतकरी महासंघाच्या संभाजी दहातोंडे आणि काही कार्यकर्त्यांना मुंबईत प्रवेश करताच मुंबईच्या मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर संप मिटलेला नसून शेतकऱ्यांत फूट पाडण्यात आली आहे. मात्र सात बारा कोरा होईपर्यंत आणि शेत मालाला हमी भाव मिळेपर्यंत संप सुरूच राहणार, असे मत मराठा शेतकरी महासंघाच्या संभाजी दहातोंडे यांनी सांगितले आहे. मानखुर्द पोलीस पोलीस ठाण्यात महासंघाच्या कार्यकरताना खबरदारीचा उपाय आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, संप मागे घेतल्याची घोषणा करतेवेळी गेल्या दोन दिवसातील अनेक महत्वाच्या घोषणा करत मुख्यमंत्र्यानी या संपाच्या दृष्टीने अनेक महत्वाची विधाने केली आहेत. शेतकऱ्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील आणि त्यासोबतच मायक्रो फायनान्ससंदर्भात उचित कारवाई केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलंय.

येवल्यात आजही दूध रस्त्यावर

येवला तालुक्यातल्या सायगावमध्ये शेतकऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. सरकारनं दिलेली आश्वासनं शेतक-यांना अमान्य आहेत. त्यामुळं आज तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आलंय. शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय. दुग्धसंस्था शेतकऱ्यांनी शंभर टक्के बंद ठेवल्या. सरकारच्या निषेधार्थ दूध रस्त्यावर ओतण्यात आलं.

परभणीत रास्ता रोको

शेतकरी संपात आज परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी उडी घेतलीय. परभणी गंगाखेड महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. भाजीपाला, फळे, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून त्यातला माल रस्त्यावर टाकला. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आलाय. ब्राम्हणगाव पाटीवर दूध-फळं भाजीपाल्याचा खच पडलाय तर वसमत तालुक्यताल्या कुरुंदामध्ये शनिवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आलाय.

पुणे-सोलापूर महामार्ग बंद

इंदापुर तालुक्यातील पुणे - सोलापूर महामार्गवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. शेतकऱ्यांचा संपूर्ण ७-१२ कोरा करा, स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा, या मागण्यांसाठी कळस, पिलेवाडी, डाळज, भादलवाडी, भिगवण येथील शेतकऱ्यांनी पुणे - सोलापूर महामार्गावक डाळज-चौफुला इथं रास्ता रोको केला.