खडसेंना काँग्रेसची ऑफर, नाथाभाऊंच्या प्रतिक्रियेमुळे खळबळ

नागपूर अधिवेशनात वारंवार आपल्याच पक्षाला अडचणीत आणणार्‍या भाजपा नेते एकनाथ खडसे यांची खदखद सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत दिसून आली.

Updated: Dec 18, 2017, 08:09 PM IST
खडसेंना काँग्रेसची ऑफर, नाथाभाऊंच्या प्रतिक्रियेमुळे खळबळ title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : नागपूर अधिवेशनात वारंवार आपल्याच पक्षाला अडचणीत आणणार्‍या भाजपा नेते एकनाथ खडसे यांची खदखद सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत दिसून आली. एकनाथ खडसे नेहमीप्रमाणे आपल्याच पक्षावर टीका करत असताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी खडसेंना विधानसभेतच काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

यशोमती ठाकूर यांच्या या ऑफरला उत्तर देताना खडसेंचा आवाज काहीसा बदलला आणि येऊ शकतो असे सांगत या पक्षासाठी ४० वर्षं काम केलं, पण परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही, असं उत्तर देऊन खडसेंनी विधानसभेत एकच खळबळ उडवून दिली. हे कसले सरकार असा सवालही त्यांनी आपल्याच भाजपा सरकारला विचारला.

परिस्थिती माणसावर कोणतीही वेळ आणू शकते असे सांगत विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत खडसे यांची पक्षातील घुसमट पुन्हा एकदा समोर आणली. राज्यात आणखी कृषी महाविद्यालये सुरू होण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना आपण आपल्या गावात १०० एकर जागा कृषी महाविद्यालयासाठी मोफत दिली. मात्र अद्याप महाविद्यालय सुरू झाले नाही.

यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी, "असा दिलदार माणूस आमच्या पक्षात येईल का" असे म्हणताच खडसे यांना भावना अनावर झाल्या. येऊ शकतो असे सांगतानाच परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही. ४० वर्षे पक्ष उभा केला, सरकार आणलं, आता हा पक्ष कसा सोडू शकतो, असे म्हणत त्यांनी स्वतःला सावरले.