खासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?

लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे. 

Updated: Feb 9, 2018, 07:08 PM IST
खासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे. 

धनंजय महाडीक कुणाकडून?

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक रिंगणात असणार की भाजपाच्या यावरुन कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी अनेक ठिकाणी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. 

महाडीकांचं पक्षविरोधी वर्तन

खासदार धनंजय महाडीक हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी, त्यांचे वर्तन पक्षविरोधी आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं खाजगी बैठकीत जाहीर केलंय. राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. उमेदवार मिळाला नाही, तर स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मुश्रीफ यांनी खासगी बैठकीत जाहीर केलंय. 

‘योग्य वेळी भूमिका मांडू’

या संदर्भात त्याच्याशी संपर्क केला असता, त्यांनी योग्य वेळी भूमिका मांडू असं स्पष्ट केलंय. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारपासून कोल्हापूर दौ-यावर आहेत. यावेळी पवार लोकसभेच्या उमेदवाराबाबत काय भाष्य करतात याकडं लक्ष लागलंय.