मुकबधीर मुलांनी बनवल्या दिवाळीसाठी खास वस्तू

रत्नागिरीत आपल्या अपंगत्वावर मात करत मुकबधिर मुलांनी दिवाळीसाठी अनेक वस्तू तयार केल्या आहेत

Updated: Oct 16, 2017, 09:18 PM IST
मुकबधीर मुलांनी बनवल्या दिवाळीसाठी खास वस्तू  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीत आपल्या अपंगत्वावर मात करत मुकबधिर मुलांनी दिवाळीसाठी अनेक वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तूंचं प्रदर्शन सध्या रत्नागिरीत सुरु आहे. ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन पहाट घेवून येतेय.

मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य होते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरीतील कै. के. प. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयातली मुलं. कारण, या विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकलेतून साकारलेल्या वस्तू पाहून मन थक्क होतं. सध्या या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये दिवाळीसाठी लागणा-या वस्तू आहेत. या माध्यमातून या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेगळी जिद्द निर्माण केली जातेय.

दिवाळीसाठी रंगीबेरंगी पणत्या, शाडूच्या मातीपासून तयार केलेले शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, रंगीबेरंगी आकाशकंदील, सुगंधी उटणं, शो-पीस आणि लाकडी वस्तू त्याचबरोबर मनमोहक शुभेच्छापत्र यावर्षी या विद्यार्थ्यांनी खास दिवळीसाठी तयार केल्या आहेत. या प्रदर्शनाला अनेक जण भेट देऊन या मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करत आहेत.

या माध्यमातून या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं हा या मागचा उद्देश असल्याचं मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी म्हटलं आहे.

या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करत रत्नागिरीकर उदंड प्रतीसाद देतायत. त्यामुळे ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन पहाट घेवूनच येणार आहे.