नवीन वर्षात मुंबईत धावणार पहिली एसी लोकल!

मुंबईत पहिलीवहिली वातानुकूलित लोकल सेवा चालविण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नास नव्या वर्षात प्रत्यक्षात मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 25, 2017, 09:37 PM IST
नवीन वर्षात मुंबईत धावणार पहिली एसी लोकल! title=

मुंबई : मुंबईत पहिलीवहिली वातानुकूलित लोकल सेवा चालविण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नास नव्या वर्षात प्रत्यक्षात मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल नव्या वर्षात नव्या ढंगात येणार आहे. म्हणजेच मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेतील पहिली एसी लोकल १ जानेवारी २०१८ मध्ये सुरु होईल. रेल्वे मंत्री पियुष गोयलने बुधवारी ही माहिती दिली. दर दिवसाला लोकलमधून ६५ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. 

वातानुकूलित लोकलची क्षमता ताशी किमान ११० किमी वेगाने धावण्याची असून प्रवासी क्षमता सुमारे ५,९२४ हजारांच्या आसपास आहे. त्यात, आसनांची संख्या १,०२८ असून उभ्याने ५,९३६ इतके जण प्रवास करू शकतात. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होणार आहेत. त्याचे  नियंत्रण मोटरमनकडे असून डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही पुरविली आहे.

ही लोकल मेक इन इंडिया धोरणातंर्गत बांधली असून त्यासाठी सुमारे ५४ कोटी रुपये खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल) ने त्यासाठी विद्युत यंत्रणा पुरविली आहे. ही लोकल सेवेत आणण्याची घोषणा २००७ मध्ये करण्यात आली होती. त्यासाठी २०११ मध्ये रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. 

ही लोकल प्रत्येक स्थानकावर २० ते ३० सेकंद थांबणे अपेक्षित असून त्यात स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.