'रायगडा'वरचा कचरा वेचण्यासाठी मावळ्यांची प्राणाची बाजी

सुमारे ६०० फुटांपर्यंत हे गिर्यारोहक दरीत उतरून कचरा वेचण्‍याचे काम करीत आहेत

शुभांगी पालवे & Updated: May 26, 2018, 10:57 PM IST
'रायगडा'वरचा कचरा वेचण्यासाठी मावळ्यांची प्राणाची बाजी title=

प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : किल्‍ले रायगड प्‍लास्‍टीक आणि कचरामुक्‍त करण्‍याच्‍या मोहिमेला सुरूवात झालीय . स्‍वराज्‍याच्‍या राजधानीचे प्‍लास्‍टीकपासून संरक्षण करण्‍यासाठी  राज्‍यभरातील गिर्यारोहकांनी प्राणाची बाजी लावलीय. हिंदवी स्‍वराज्‍याची राजधानी असलेल्‍या किल्‍ले रायगडावर दरवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात . त्‍यांच्‍या माध्‍यमातून मोठया प्रमाणावर  प्‍लास्‍टिक किंवा अन्‍य वस्‍तूंचा कचरा गडावर येत असतो . अनेक सेवाभावी किंवा शिवप्रेमी संस्‍था गडावर स्‍वच्‍छता मोहीम राबवत असतात . परंतु गडाच्या बुरूज किंवा तटबंदीवरून खोल दरीत टाकलेला कचरा मात्र वर्षानुवर्षे तसाच असतो. खोल दरीतील हा कचरा साफ करण्‍याचा संकल्‍प किल्‍ले  रायगड संवर्धन व विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार संभाजी राजे यानी सोडलाय. या मोहीमेला सुरूवात झाली असून मुंबई, सातारा, कोल्‍हापूर येथील ३० गिर्यारोहक यात सहभागी झाले आहेत .

सुमारे ६०० फुटांपर्यंत हे गिर्यारोहक दरीत उतरून कचरा वेचण्‍याचे काम करीत आहेत.  यात मोठया प्रमाणावर प्‍लास्‍टिक, बियरचे टीन, प्‍लास्‍टीकच्‍या पिशव्‍या असा कचरा आहे.  या कामाला हिरकणी बुरूज आणि रोपवेकडून सुरूवात  झाली असून दोन दिवस  हे काम चालणार आहे.

स्‍वराज्‍याच्‍या रक्षणासाठी मावळे प्राणपणाने लढले. आता रायगडचे प्‍लास्‍टिकपासून संरक्षण करण्‍यासाठी गिर्यारोहक जीवाची बाजी लावत आहेत. मात्र कचरा आणि प्‍लास्‍टिकमुक्‍त रायगडचा संकल्‍प प्रत्‍येकाने केला तर ही वेळच येणार नाही.