दत्तक जाण्यापूर्वीच चिमुरडीला मिळाले खरे आई-बाबा!

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर चोरीला गेलेल्या तनिष्काला तब्बल दीड वर्षानंतर आपले आई-वडील भेटले... तेही तिला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु असताना... अगदी सिनेमात वाटावी अशी तनिष्काची ही कहाणी...

Updated: Aug 18, 2017, 03:41 PM IST
दत्तक जाण्यापूर्वीच चिमुरडीला मिळाले खरे आई-बाबा! title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर / पुणे : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर चोरीला गेलेल्या तनिष्काला तब्बल दीड वर्षानंतर आपले आई-वडील भेटले... तेही तिला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु असताना... अगदी सिनेमात वाटावी अशी तनिष्काची ही कहाणी...

मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या या तनिष्काला आज तब्बल दीड वर्षांनी आपले आई वडील आणि आजी आजोबा भेटलेत... हरवलेली मुलगी परत मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांच्या आनंदालाही पारावार नाहीय... गेल्या वर्षी मार्चमध्ये तनिष्का आपल्या आज्जीसोबत पुण्याहून कोल्हापूरला जात होती... त्यावेळी रेल्वे स्टेशनवर एका अज्ञात व्यक्तीनं तिला पळवून नेलं. त्यावेळी पोलिसांनी शोध घेऊनही ती सापडली नाही... काही दिवसांनतर तनिष्का ससून रुग्णालयाबाहेर सापडली आणि पोलिसांनी तिला सोफोश या संस्थेमध्ये दाखलं केलं... सोफोशमध्ये दत्तक घेण्यासाठी एका जोडप्यानं तिची निवडही केली. मात्र, त्याच वेळी रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात तनिष्का 'सोफोश'मध्ये असल्याचं समजलं.

सोफोश मध्ये आल्यानंतर तनिष्काला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र, त्याच वेळी तिचे आई - बाबा कोल्हापुरात असल्याचं तपासात पुढे आलं... आणि कायदेशीर बाबी तपासून तिला कांबळे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं.

दत्तक गेल्यानंतर तनिष्काला नव घरं मिळणार होतं. मात्र तिचे आई - बाबा परत मिळाले आणि तनिष्का तिच्या मूळ घरी परतली.