'दुरान्तो'मधून प्रवास करतोय हवाल्याचा पैसा आणि सोन्या-चांदीचा अवैध व्यापार

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून सुरु असलेल्या हवालाच्या पैशांचा आणि सोने-चांदीच्या अवैध व्यापाऱ्याचा आरपीएफने पर्दाफाश केलाय. 

Updated: Dec 7, 2017, 11:40 PM IST
'दुरान्तो'मधून प्रवास करतोय हवाल्याचा पैसा आणि सोन्या-चांदीचा अवैध व्यापार

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून सुरु असलेल्या हवालाच्या पैशांचा आणि सोने-चांदीच्या अवैध व्यापाऱ्याचा आरपीएफने पर्दाफाश केलाय. 

बुधवारी संध्याकाळी कारवाई करत आरपीएफने दुरान्तोमधून हवालाचे ३० लाख रुपये जप्त करत एका आरोपीला अटक केली. त्यानंतर आज सकाळी  मुंबईहून नागपुरला आलेल्या दुरान्तोमधून सोने-चांदीचे २९ पॅकेट्स अवैधपणे घेवून येणाऱ्या एकाला पकडले.

मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसला सर्वसामान्यांची पहिली पसंती असते. मात्र या सुपरफास्ट ट्रेनचा वापर मात्र  गैर उद्योगांसाठीही सुरू झाल्याचं दिसतंय.  गेल्या काही दिवसांपासून दुरान्तोमधून  हवाला व्यापारी आणि अवैधपणे सोने चांदीचा व्यापार सुरु असल्याचं उघड झालंय. बुधवारी रात्री नागपूर-मुंबई दुरान्तोमधून महेंद्र तरोळे याला आरपीआयने बेड्या ठोकल्या. त्याच्या बॅगेत तब्बल 30 लाख रुपये आढळून आले. हे पैसे हवालाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

त्याच्या  चौकशीतून  सकाळी मुंबईवरून  दुरान्तो एक्स्प्रेसमधून दुसरी खेप येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी मुंबईहून नागपुरात दाखल झालेल्या दुरांतो एक्सप्रेसमधून एका इसमाकडून सोने-चांदीची सुमारे २९ पॅकेट्स पकडली. यात एकाला अटक करण्यात आलीय.   

नागपुरातील एक कुरिअर कंपनीमार्फत दुरान्तोतून हा सगळा अवैध व्यापार अनेक दिवसांपासून सुरु होता. जप्त करण्यात आलेले हवालाचे पैसे  आणि लाखोंची सोनं-चांदी कुणाची आहे ? पकडण्यात आलेले आरोपी कुणासाठी ही कामं करत होते याचा तपास सुरू आहे.