'हेल्प रायडर्स'चा व्हॉटसअप ग्रुप नागरिकांना देतोय जीवदान

 या ग्रुपमध्ये थोडेथिडके नाही तर तब्बल २०० सदस्य आहेत

Updated: Jul 27, 2018, 01:27 PM IST
'हेल्प रायडर्स'चा व्हॉटसअप ग्रुप नागरिकांना देतोय जीवदान  title=
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : शहरांतील वाहतूककोंडीचा फटका अनेकदा रुग्णवाहिकांना बसतो... अशात वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावण्याची भीती असते. मात्र औरंगाबादच्या काही तरुणांनी यावर उपाय शोधलाय. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देताना आता औरंगाबादच्या रस्त्यावर तुम्हाला पोलीस नाही तर 'हेल्प रायडर्स' दिसत असतील. शहरातील कोणत्याही भागात वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली... की हेल्प रायडर्स तातडीनं तिथं दाखल होतात... आणि रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देतात. 
 
यासाठी या तरुणांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलाय... त्या माध्यमातून संपूर्ण शहरावर या तरुणांची नजर असते. या ग्रुपमध्ये थोडेथिडके नाही तर तब्बल २०० सदस्य आहेत. प्रसंगी रुग्णवाहिकेच्या मार्गातील खड्डे बुजवण्याचे कामही ही तरुणाई तातडीनं करते.
 
वाहतूक कोंडीमुळे उपचाराअभावी कुणाचा जीव जाऊ नये, हाच या तरुणांचा मुख्य हेतू... त्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांची बैठकही होते. काम करण्याचं कुणावरही कोणतही बंधन नाही. रुग्णवाहिकांना वाट मोकळी करुन देणारा औरंगाबादच्या तरुणांचा हा उपक्रम जितका कौतुकास्पद तितकाच अनुकरणीय देखील आहे.