नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Updated: Nov 21, 2017, 03:57 PM IST
नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

रात्री अकरा वाजता निलेश पुंड ड्युटीवरून घरी येत असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या पोटाला आणि हाताला जबर मार लागला. धडक दिल्यावर थांबण्याऐवजी धरधाव वेगात कार पुढे निघून गेली. 

निलेश पुंड यांना उडवण्याआधी या स्कोडा कारने एक मोटरसायकल आणि एक गाय यांनाही धडक दिली होती. यात मोटर सायकल स्वार जखमी झाला. तर गायही दुखापतग्रस्त झाली. पुढे जाऊन या कारने दुसऱ्या एका कारला धडक दिली. त्यात दोघे जखमी झाले. स्कोडा कारमध्ये चार तरूण होते. कारला धडक दिल्यावर अखेर या स्कोडामधल्या धुमाकूळ घालणाऱ्या तरूणांना नागरिकांनी पकडलं. मात्र पोलीस येईपर्यंत तिघे पळून गेले. तर अरबाज शेख या तरूणाला पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान स्थानिकांनी या कारची चांगलीच तोडफोड केली. 

कारमधले चौघेही वाढदिवसाची पार्टी करून येत होते. मात्र त्यांनी दारू प्यायली नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. दुचाकी स्वाराला धडक दिल्यावर काही जण कारचा पाठलाग करत होते. दोन मोटरसायकल, एक कार आणि एका गाईला धडक देऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशाप्रकारे बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाई कऱण्याची मागणी नागरिकांनी केलीय.