कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण

कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 02:43 PM IST
कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण

रत्नागिरी : कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.

 होळी उत्सवाला उधाण

फागपंचमीपासून कोकणात होळी उत्सवात आनंदाला उधाण येते. आजपासून कोकणातल्या पारंपारिक शिमगोत्सवाला सुरवात झालीय. कोकणात फागपंचमीला शेवरीच्या झाडाची होळी आणण्याची प्रथा आहे. होळीसाठी गावाजवळच्या जंगलातून शेवरीच्या झाडाची निवड केली जाते.. आणि त्यानंतर फागपंचमीला ही होळी आणण्यासाठी बालगोपळ आणि वाडीतली सर्व मंडळी जमतात. ढोल ताशांचा गजर सुरु होतो.

होळी तोडण्याची प्रथा

 त्यानंतर सुरु होते होळी तोडण्याची प्रथा, होळी तोडताना नारळ आणि पानाचा मानाचा विडा होळीच्या झाडाच्या बाजूला ठेवला जातो. हा मान मानकऱ्याचा असतो. होळी तोडण्यापूर्वी गा-हाणं घातलं जातं. यानंतर लगबग सुरु होते ती शिरव या झाडाच्या होळी तोडण्याची. गावातल्या प्रत्येक जातीला इथं मान असतो. 

होळी तोडण्यासाठी त्या ठिकाणची साफ सफाई केली जाते. होळी तोडून एका बाजूला पाडली जाते. आणि त्या ठिकाणाहून तोडलेले शिरवाचे झाड उचलून आणलं जातं. सर्व मंडळी फाकांच्या माध्यमातून हि होळी आपल्या वाडीपर्यत घेवून येतात. 

होळीची विधिवत पुजा  

ढोल ताशांच्या गजरात शेवरीचं झाड तोंडून आणलं जातं. होळी नाचवत गावात आणली जाते. गावकरी हातातून होळी नुसती आणत नाहीत. तर ती हवेत उडवत आणतात. तिची  विधिवत पुजा केली जाते. आणि गावागावातून वाड्या वस्तीतून शेवरीच्या होळ्या उभ्या रहातात.. होळी भोवती रात्री होम केला जातो.  

कोकणात मोठा सण

शेवरीच्या या छोट्या होळीनं सणाची सुरुवात होते. यानंतर माड पोफळ आंबा अशा झाडांची मुख्य होळी उभी केली जाते. आणि त्यानंतर भद्रा पोर्णिमेला मुख्य होम केला जातो. गौरी गणपतीनंतर कोकणात मोठा सण असतो तो शिमग्याचा. त्यामुळे या शिमगोत्सवासाठी कोकण गजबजू लागलंय..