एका नवीन वादानं होणार FTII मध्ये अनुपम खेर यांचं स्वागत

पुण्यातील एफटीआयआय म्हणजेच 'फिल्म एन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मधील सेकंड इअर डिरेक्शनच्या विद्यार्थ्यांनी क्लासेसवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे इन्स्टिट्यूटचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते अनुपम खेर यांचं स्वागत एका नवीन वादाने होणार आहे.

Updated: Oct 12, 2017, 10:49 PM IST
एका नवीन वादानं होणार FTII मध्ये अनुपम खेर यांचं स्वागत title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील एफटीआयआय म्हणजेच 'फिल्म एन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मधील सेकंड इअर डिरेक्शनच्या विद्यार्थ्यांनी क्लासेसवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे इन्स्टिट्यूटचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते अनुपम खेर यांचं स्वागत एका नवीन वादाने होणार आहे.

आंदोलन ही गोष्ट 'एफटीआयआय'मध्ये नवीन नाही. किंबहुना हा इथल्या परंपरेचाच भाग म्हणता येईल. आजही ही मुलं क्लासेस सोडून बाहेर बसली आहेत. यांच्या अभ्यासक्रमात 'डायलॉग एक्झरसाईझ' नावाचा एक प्रकार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक फिल्म बनवायची असते. पूर्वी ही फिल्म बनवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जायचा. तो दोन दिवसांवर आणल्यानं विद्यार्थ्यांनी बहिष्कार आंदोलन सुरु केलंय. यासंदर्भात एफटीआयआय प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये गेले कित्येक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.  

'एफटीआयआय'चा अभासक्रम बदलण्यात आलाय. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत फिल्म पूर्ण करणं बंधनकारक आहे. जे विद्यार्थी प्रोजेक्ट पूर्ण करणार नाहीत त्यांना परत तशी संधी मिळणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

'एफटीआयआय'च्या नियमांचं पालन न करता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगादेखील उगारण्यात आला होता. मात्र, तो निर्णय मागे घेण्यात आला. दरम्यान, एफटीआयआयमधील वातावरण पुन्हा ढवळून निघालय. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. लवकरच ते पदभार स्वीकारतील. मात्र याधीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्याप्रमाणेच खेर यांचं स्वागतही वादानंच होणार हे नक्की...