पुण्याच्या ढोल पथकांना मिळतं एवढं मानधन

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली ढोल पथकं राज्यातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली आहे.

Updated: Sep 21, 2018, 08:57 PM IST
पुण्याच्या ढोल पथकांना मिळतं एवढं मानधन  title=

अश्विनी पवार, प्रतिनिधी झी मीडिया, पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली ढोल पथकं राज्यातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली आहे. ढोल ताशा पथकामध्ये वाजवणाऱ्या वादकांना किती मानधन मिळतं? ढोल पथकं सगळ्या सुपाऱ्या कशा पूर्ण करतात? या ढोल पथकांचं अर्थकारण कसं चालतं, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला. 

पुण्यात १७० ढोलताशा पथकं

पुण्यात नोंदणी असलेली १७० ढोलताशा पथकं आहेत. नोंदणी नसलेली पथकं मिळून ही संख्या दोनशेच्या वर जाते. एका ढोल पथकामध्ये ८० ते ६०० वादक असतात. हे सगळे वादक ढोल वाजवण्यासाठी एक रुपयाही मानधन घेत नाहीत. त्यासाठी दीड ते दोन महिने रोज तीन तास सराव केला जातो.

ढोल पथक मालकांना मानधन

ढोल पथकाच्या मालकांना मात्र मानधन दिलं जातं. ढोल पथकांच्या मालकांना साधारणपणे तासाला १० ते ३० हजार एवढं मानधन मिळतं. मोठ्या पथकांकडून एका मिरवणुकीसाठी हेच मानधन सहा आकड्यांमध्ये म्हणजेच २ ते ३ लाखांपर्यंतही घेतलं जातं. गणेशोत्सवाच्या १० ते १२ दिवसांत किती मिरवणूकांमध्ये वादन करायचं हे पथक ठरवतं. जास्त सदस्य संख्या असलेली पथकं एका वेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दोन ते चार गटांमध्ये वादन करतात. त्यावरुनच दहा दिवसांत या पथकांची कमाई लाखोंवर जाते.

ढोलताशा पथकांचा मुख्य खर्च

दोन महिन्यांच्या सरावासाठी जागा भाड्याने घेणं, शेड टाकणं याबरोबरच ढोल ताशांची डागडुजी हा या पथकांचा मुख्य खर्च असतो. एका पथकात ५० ते ६० ढोल आणि  ३० ते ४० ताशा असतात. ज्याची पानं बदलणं आणि पॉलिशींग सारखी काम पथकाला करावी लागतात. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या १० दिवसात पथकांतील सदस्यांना नाश्ता जेवण पुरवणं, शहराबाहेरील सुपा-यांसाठी घेऊन जाणं हा देखील खर्च पथकांच्या व्यवस्थापनाकडून केला जातो. मात्र अनेकदा ही सोय मंडळही करतात. आता डॉल्बी बंदीचा फटका ५०० हून अधिक डॉल्बीधारकांना बसणार आहे. पण यामुळे ढोल ताशा पथकांची मागणी मात्र वाढणार आहे. ज्यामुळे पथकांमधली सदस्य संख्या आणि पथकांची संख्याही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात मानाची ढोल पथकं

पुण्यात जसे मानाचे गणपती असतात, तशी मानाची ढोलपथकंही असतात. लक्ष्मी रस्ता हा विसर्जन मिरवणूकीतील मानाचा मार्ग. मानाच्या गणपतींची मिरवणूक ही लक्ष्मी रस्त्यावरुनच जाते. त्यामुळे या रस्त्यावर वादन करण्याचा मान मिळणं ही पथकांसाठी प्रतिष्ठेची बाब. एकदा का या रस्त्यावरील मिरवणुकीत पथकाचा आव्वाज घुमला, की पुढची काही वर्ष पथकाकडे गणेश मंडळांनी तारखांसाठी रांगा लावल्याच म्हणून समजा. आणि मग ते ढोल ताशा पथकही मानाचं पथक म्हणून मिरवतं.