सरकारी हमीभाव गेला चुलीत... व्यापारीच खातायत मलिदा!

यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दरानं कापूस खरेदी केली जात असल्याचं उघड झालंय.

Updated: Oct 24, 2017, 08:10 PM IST
सरकारी हमीभाव गेला चुलीत... व्यापारीच खातायत मलिदा! title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दरानं कापूस खरेदी केली जात असल्याचं उघड झालंय.

यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी कापूस खरेदी केंद्रांवर आणि जिनींग प्रेस केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छापे मारले. व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्याचं या छाप्यात उघड झालं. सरकारी कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरु न झाल्यामुळं शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने कापूस विकण्याची वेळ आली आहे. सरकारनं कापसाला ४३२० रु हमीभाव जाहिर केला असला तरी व्यापारी  ३५०० ते ३८०० या दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहेत.  सरकारच्या हमी भावाला व्यापाऱ्यांनी हरताळ फासला आहे.

दरवर्षी राज्य सरकारकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी केंद्रात हमी भावानं कापूस खरेदी केली जाते. मात्र, यावर्षी दिवाळी उलटून गेली तरी सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु झाले नाहीत. त्यामुळं व्यापारी आणि दलालांचं चांगलं फावलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची जाहिरातबाजी केली जात असली तरी प्रत्येक्षात सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु झाले नाहीत हे वास्तव आहे.

परतीच्या पावसामुळे इतर पिकांप्रमाणे कपाशीचं मोठे नुकसान झाले. त्यामुळे ओला कापूस खेडा खरेदीत अडीच हजार रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  

गेल्या काही हंगामात सोयाबीन, तूर आणि इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं होतं. त्यामुळं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. मात्र, वेळेवर सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळं शेतकऱ्यांची लूट होत आहे. 

हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, व्यापारी आणि दलालांवर त्याचा कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे. आता सरकार कोणती पावलं उचणार, याकडं बळीराजाचं लक्ष लागून राहिलं आहे.