तुरुंगातून घराघरांमध्ये गेलेला बाप्पा...

पर्यावरणपूरक आणि तरीही स्वस्त असलेल्या या सुबक मूर्तींना नाशिककरांनी पसंती दिलीय

Updated: Sep 14, 2018, 12:02 PM IST
तुरुंगातून घराघरांमध्ये गेलेला बाप्पा...  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यभरात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू होती तेव्हा हाच उत्साह नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातही बघायला मिळाला... नाशिककरांनी चक्क बाप्पाला घरी नेण्यासाठी कारागृहात गर्दी केली.

एरवी कैद्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची तुरुंगात गर्दी असते... पण आजची गर्दी वेगळी आहे... हे लोक आले आहेत बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी... तुरुंगातल्या कैद्यांनी घडवलेल्या गणेशमूर्ती नाशिककरांनी आपल्या घरी नेल्या आणि त्यांची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली... कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या या प्रयत्नांना नाशिककरांनी असा सक्रीय पाठिंबा देऊ केला. 

संजय पवार यानं अन्य कैद्यांच्या मदतीनं जवळ-जवळ साडे तीन हजार मूर्ती घडवल्या. महत्त्वाचं म्हणजे या सर्व मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार केल्यात. पर्यावरणपूरक आणि तरीही स्वस्त असलेल्या या सुबक मूर्तींना नाशिककरांनी पसंती दिलीय. 

या उपक्रमामुळे कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झालीय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उपजीविकेचं चांगलं साधन आपल्याला उपलब्ध आहे, याची या कैद्यांना खात्री झालीय... राज्यातल्या अन्य तुरुंगांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम राबवले, तर त्याचा समाजाची घडी नीट बसवण्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकेल...