सांगलीच्या राजकारणाला नवे वळण, जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र

दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समिकरणांना वेग आला यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच कौतुक केलं. 

Updated: Apr 22, 2018, 07:59 PM IST
सांगलीच्या राजकारणाला नवे वळण, जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र title=

सांगली : कट्टर राजकीय विरोधकांचा एकाच गाडीतून प्रवास आज मिरजकराना बघायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे दोघंही मिरजेतील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र होते. त्या अगोदर या दोन्ही नेत्यांनी एका गाडीतून प्रवास केला.

जयंतरावांनी केले राजू शेट्टींचे कौतूक

दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समिकरणांना वेग आला यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच कौतुक केलं. राजू शेट्टी हे माझे खासदार, माझ्या मतदारसंघातील खासदार आहेत. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ह्याची खात्री झाल्यावर राजू शेट्टी यांनी निर्भीडपणे पाठिंबा काढून घेतला . सरकार विरोधी जाऊन काम करणं कठीण असतं, मात्र सक्षम पणे राजू शेट्टी काम करत आहेत, असं वक्तव्य माजीमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

राजू शेट्टींची भाजप सरकारवर टीका

खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी भाजपा सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी मला निवडणूकी आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होत. मात्र नंतर कळलं की त्यांनी सर्व थप्पा मारल्या होत्या. आम्ही भाजपाचा नाद सोडला, मात्र अजुन ह्यांचा हात धरला नाही, असं जयंत पाटील यांच्याकडे हातवारे करत टोलाही हाणला....एकुणच दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समिकरणांना वेग आला.