कोंबड्यापासून सावधान! कोल्हापूरकरांचा नाद खुळा

कुणी कुत्रा पाळून तर कुणी सुरक्षारक्षक नेमून आपल्या घराची सुरक्षा करतो.

Updated: Jul 17, 2017, 10:56 PM IST
कोंबड्यापासून सावधान! कोल्हापूरकरांचा नाद खुळा

कोल्हापूर : कुणी कुत्रा पाळून तर कुणी सुरक्षारक्षक नेमून आपल्या घराची सुरक्षा करतो. पण कोल्हापुरातल्या कसबा बावड्यामधल्या एका घरावरची पाटी मात्र जरा काही वेगळीच आहे.

कोंबड्यापासून सावधान ही पाटी बघितल्यावर आपण पुण्यात आलो का काय असा समज तुमचा होईल पण ही पाटी आहे कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतली. सुनील पाटील यांनी आपल्या घराबाहेर कोंबड्यांपासून सावधान अशी पाटी लावलीय.

हा कोंबडा परिसरात येणा-यांसाठी भीतीचं कारण ठरलाय. अनोळखी व्यक्तीला हा कोंबडा घरात फिरकू सुद्धा देत नाही. संपूर्ण कॉलनीच या कोंबड्याच्या दहशतीत आहे.

या कोंबड्यामुळे मराठा कॉलनीत चांगलीच दहशत निर्माण झालीय. त्यामुळेच पाटील कुटुंबानं आता आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर कोंबड्यापासून सावध रहा असं लिहिल्यानं हा विशेष रखवालदार कोंबडा चांगलाच चर्चेचा विषय बनलाय.