कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 29, 2017, 12:35 PM IST
कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा title=

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

न्यायालयाचा निकाल

तीनही आरोपींना खून आणि बलात्काराच्या कटासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. बलात्कार, बलात्काराचा कट रचणं आणि हत्या अशा वेगवेगळ्या कलमांखाली ही शिक्षा सुनावण्यात आलीय. 

जितेंद्र बाबुलाल शिंदेनं (आरोप क्रमांक १) पीडित मुलीचा विनयभंगासाठी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसंच अज्ञान मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली जन्मठेप आणि २० हजार रुपयांची शिक्षा ठोठावण्यात आली.

तर संतोष गोरख बवाळ (आरोपी क्रमांक २) आणि नितीन गोपीनाथ भैलुमे  (आरोपी क्रमांक ३) याला बलात्काराचा कट आणि आरोपी क्रमांक-१ ला गुन्ह्यासाठी उद्युक्त करणे या गुन्ह्यांसाठी जन्मठेप आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तसंच आरोपी क्रमांक २ मुळे अनेकदा खटल्याचं काम तहकूब करण्यात आलं होतं... त्यासाठी कोर्टानं त्याला १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. हा खर्च वसूल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत... ही थकबाकी भरली नाही तर आरोपीला तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिलीय.  

आरोपींना या सर्व शिक्षा एकत्रच भोगाव्या लागणार आहेत... यातील सर्वात कठोर शिक्षा ही फाशीची शिक्षा आहे. वरच्या कोर्टात जाण्याचा मार्ग आरोपींकडे उपलब्ध आहे. 

 

दुर्दैवी आईची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भय्यूजी महाराजांनी आम्हाला साथ दिली... सगळा मराठा समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळवून दिला... मी सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईनं दिलीय. 

आरोपी न्यायालयात हजर

यापूर्वी माध्यमांना चकवा देत तीनही आरोपींना १०.०० वाजल्याच्या सुमारास मागच्या दारातून न्यायालयात आणलं गेलंय. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. सुनावणीसाठी पीडित मुलीच्या आईसह कोपर्डीचे ग्रामस्थ न्यायालयात हजर होते. 

युक्तीवाद पूर्ण

अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. तर आरोपी संतोष भवाळच्या वकिलांनी कोर्टात त्यांचा अशील निर्दोष असून त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा केला होता.

कोपर्डी निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.