यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद

यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात आलंय. कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची कृती बेकायदेशीर असून व्यावसायिकांची प्रतिष्ठा आणि स्थैर्य उध्वस्त करणारी आहे.

Updated: Nov 3, 2017, 08:13 AM IST
यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद title=

यवतमाळ : यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात आलंय. कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची कृती बेकायदेशीर असून व्यावसायिकांची प्रतिष्ठा आणि स्थैर्य उध्वस्त करणारी आहे.

शासनानं कृषी विक्रेत्यांबाबत धडक कारवाईचा देखावा करून जनमानसात गैरसमज पसरविले आहे. शासनाच्या अंदाधुंद कारवाईमुळे आम्ही मानसिकदृष्ट्या खचलो असल्याची भावना कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने व्यक्त करत बंद पुकारला आहे.

या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्यांना कीटकनाशक देण्यास मनाई केल्या जात आहे. रत्नागिरी अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशननंही या बंदला पाठिंबा दिला आहे. यवतमाळ येथे झालेल्या घटना या दुदैवीच आहेत. परंतु  हे तिथेच का घडले याचा सखोल अभ्यास करण्याऐवजी कृषि औषधे विक्रेत्यांना जबाबदार धरले जात  आहे. त्यांच्यावर जाचक अटी लादण्यात येत आहेत. आता रत्नागिरी आणि कोकणातील आंबा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे आता झाडांवर फवारणी केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर लेबल क्लेम असलेली केवळ सात औषधेच वापरावी आणि विक्रेत्यांनी ती विकावी असा दबाव टाकण्यात येत आहे. मात्र केवळ हीच औषधे बागायतदारांनी फवारली तर या हंगामामध्ये आंब्याचे पीकच येणार नाही. यातील बहुतांश औषधे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय घातकी असल्याचे रत्नागिरीतील आंबा व्यावसायिक आणि रत्नागिरी अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे.