महायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने

Loksabh 2024 : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशावरून पेटलीय, पाहूयात हा रिपोर्ट...

योगेश खरे | Updated: May 9, 2024, 07:51 PM IST
महायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने title=

Loksabh 2024 : नांदगावमध्ये महायुतीतला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारासाठी नांदगावात शिवसेना कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केला. भुजबळ आणि राष्ट्रवादीचे लोक तुतारीचं काम करत असल्याची टीका कांदेंनी केली. एवढंच नाही तर त्यांनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. कांदेच्या टीकेला थेट उत्तर देणं भुजबळांनी टाळलं. मात्र आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते महायुतीचेच काम करताहेत असं सांगायला भुजबळ विसरले नाहीत... 

नाशिकच्या राजकारणात भुजबळ आणि कांदे यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. दोघांमध्ये वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही.

कोण आहेत सुहास कांदे?
सुहास कांदे मूळचे कुस्तीपटू, महाराष्ट्र केसरीपर्यंत त्यांनी मजल मारली. 2006 मध्ये त्यांनी मनसेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आणि त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 ला नांदगावमधून पंकज भुजबळांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. 2019 मध्ये मात्र कांदेंनी भुजबळ पुत्राचा पराभव केला
हाच पराभव भुजबळ कुटुंबीयांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जातं. 2021 मध्ये छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन बैठकीतच दोघांमध्ये खडाजंगी रंगली...

सुहास कांदे आता शिवसेना शिंदे गटात सामील झालेत. नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात चांगलीच रस्सीखेच रंगली. आता महायुतीत एकत्र असूनही भुजबळ विरुद्ध कांदे वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यांच्या या भांडणामुळं दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांची डोकेदुखी मात्र वाढलीय.

दिंडोरीचं राजकीय गणित
2009 मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पहिल्यांदा मालेगाव आणि नंतर दोनवेळा दिंडोरीतून विजयाची हॅटट्रिक केली. 2009 मध्ये चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांचा केवळ 37 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालिन उमेदवार भारती पवारांना तब्बल अडीच लाख मतांनी धूळ चारली.
2019 मध्ये भाजपनं चव्हाणांना ब्रेक दिला आणि डॉ. भारती पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मोदी लाटेवर स्वार होत भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महालेंचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4, तर भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला.