पुण्यात पुरातन गुहेचा शोध, गुहा सरबत विक्रेत्या मुलाने शोधून काढली

 आकारानं त्रिकोणी असल्यामुळं त्याचं तिकोणा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच किल्ल्यावर एक शिवकालीन गुंफा सापडलीय.

Updated: Oct 4, 2018, 07:16 PM IST
पुण्यात पुरातन गुहेचा शोध, गुहा सरबत विक्रेत्या मुलाने शोधून काढली

विशाल पडाळे, लोणावळापुणे : मावळ तालुक्यातल्या तिकोना किल्ल्यावर एका पुरातन गुहेचा शोध लागलाय. एका लिंबू सरबतवाल्या लहानग्या मुलानं ती शोधून काढली. नेमकी कशी सापडली ही गुहा, पाहूयात हा खास रिपोर्ट. 

जगप्रसिद्ध तिकोणा किल्ला. मावळ तालुक्यातील पवनमाळ प्रांतातला. अनेक नागमोड्या वाटा असलेला. मावळ परिसरावर वचक ठेवण्यासाठी तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, राजमाची अशा दुर्गांची उभारणी करण्यात आली. त्यातलाच पवना नदीच्या धरणाजवळ वसलेला गिरीदुर्ग प्रकारातला हा तिकोणा किल्ला. आकारानं त्रिकोणी असल्यामुळं त्याचं तिकोणा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच किल्ल्यावर एक शिवकालीन गुंफा सापडलीय.

आणि ही गुंफा कुणा इतिहास संशोधकानं नव्हे, तर साध्या लिंबू सरबत विक्रेत्या मुलानं शोधून काढलीय. गुरूदास मोहन नावाचा तरूण पर्यटकांच्या चहापाण्याची व्यवस्था करतोय. एकदा एका माकडानं त्याचं साहित्य पळवलं. त्या माकडाचा पाठलाग करता करता गुरूदासला किल्ल्याच्या अतिदुर्गम भागातली ही गुहा सापडली.

तिकोना किल्ल्यावर सापडलेल्या या गुहेला दोन मार्ग असून त्यात जिवंत पाण्याचा झरा देखील आहे. तिथं त्याला काही खापराचे तुकडेही सापडले. गुरुदास हा दुर्गसंवर्धक संस्थेचा सदस्य असल्यानं त्यानं लगेच ही बाब आपल्या सहकाऱ्यांना कळवली. त्यानंतर दुर्गसंवर्धक संस्थेचे कार्यकर्ते किरण चिमटे व अन्य सदस्यांनी गुहेची पाहणी करून पुरातत्व खात्याला त्याबाबत कळवलं. ही गुहा पाहण्यासाठी आता दुर्गप्रेमींची गर्दी वाढलीय. 

या गुहेच्या संदर्भात पुरातत्व खात्याकडं काही नोंदी उपलब्ध आहेत का? या गुहेचं नेमकं ऐतिहासिक महत्व काय? याबाबतची माहिती लवकरात लवकर उजेडात यावी, अशीच तमाम दुर्गप्रेमींची अपेक्षा आहे. तुम्ही देखील लोणावळ्याला आलात तर हा तिकोणा किल्ला आणि त्यावरची ही नवी गुहा नक्की पाहायला या.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close