महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल

महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर. मुंबईतल्या वरळी वांद्रे सी लिंकप्रमाणं इथल्या शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा केबलनं जोडलेला पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. शिवाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काचेची पारदर्शक प्रेक्षकगॅलरीही तयार करण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2018, 08:22 PM IST
महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल

विकास भोसले,  सातारा : महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर. मुंबईतल्या वरळी वांद्रे सी लिंकप्रमाणं इथल्या शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा केबलनं जोडलेला पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. शिवाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काचेची पारदर्शक प्रेक्षकगॅलरीही तयार करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर तापोळ्याचा हा शिवसागर जलाशय. थंडगार हवेचा गारवा आणि निसर्गरम्य वातावरणात इथं बोटिंगचा आनंद घेता येतो. या नैसर्गिक सौंदर्यात लवकरच भर पडणाराय ती केबल पुलाची. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं तब्बल 75 कोटी रूपये खर्च करून हा पूल बांधण्यात येतोय.

मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर हा नियोजित पूल असणार आहे. वरळी सी लिंक चायनीज तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर शिवसागर जलाशयावरील नियोजित पूल जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे.हा पूल दोन लेनचा असेल. पुलावर दोन्ही बाजूला दोन मीटर रुंद पदपथ बांधण्यात येणार आहे.

महिनाभरात या महत्त्वाकांक्षी पुलाचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणाराय. यामुळं तापोळा भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. महाबळेश्वरला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक जगभरातून इथं येतात. पण तेच तेच पॉईंट पाहून त्यापैकी अनेकजण कंटाळले असतील. अशा पर्यटकांसाठी शिवसागर जलाशयावर तयार होणारा नवा पूल आणि त्यावरील काचेची पारदर्शक व्ह्यू विंग गॅलरी हे नवं आकर्षण ठरेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close